दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – अजितदादा पवार

पुणे (बारामती झटका)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दूध भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा केला जाणार असून दूध भेसळ करणाऱ्यांवर मोका लावला जाईल, असे संकेत दिले आहेत. पुढे बोलताना पवार म्हणाले, राज्यात दुधात भेसळ होत आहे. दूध भेसळ विरोधात कडक कायदा केला जावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यावरून आम्ही दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असेही पवार म्हणाले. बारामती मध्ये रविवारी दि. ४ ऑगस्ट रोजी ते बोलत होते.
पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी आमची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आता राज्य सरकार दूध भेसळ करणाऱ्यांवर मोका लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी सरकारने दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचेही अजितदादा पवार यांनी सांगितले आहे.
अजितदादा पवार यांनी सध्याच्या राजकारण आणि टीका टिप्पणीवर भाष्य करताना, मी फक्त राज्याच्या विकासावर बोलतो. कोण कोणाला काय म्हणतं, याकडे मी बघत नाही. कोण कोणाला ढेकूण म्हणतं. आता तर फक्त एकमेकांचे कपडे काढायचे बाकी ठेवले आहे. यामुळे विकासाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही लक्ष घालण्याची गरज असल्याचेही, अजितदादा पवार यांनी सांगितले आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेताना स्वतंत्र कायदा करण्याचे ठरवल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. तसेच राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवावी. दोषींवर कडक कारवाई करावी, असेही निर्देश शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थात भेसळ होत आहे. यावरून भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.