वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती (बारामती झटका)
बारामती तालुक्यात वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत २७ ते ३० जुलै २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत साडेआठ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आलेला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत वाहनमालक वा वाहनचालकांकडून वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल विविध ५५ प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरल्याबद्दल (ओव्हरलोड) १७ प्रकरणात ७ लाख ७२ हजार रुपये, योग्यता प्रमाणपत्र नसन्याच्या अनुषंगाने ७ प्रकरणात १४ हजार, विमा प्रमाणपत्राच्या ३ प्रकरणात ४ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
नोंदणी क्रमांकाच्या अनुषंगाने २ प्रकरणात २ हजार रुपये, परावर्तिका लावली नसणे या अनुषंगाने ३ प्रकरणात ३ हजार रुपये, काळी काच असलेल्या २ वाहनांकडून १० हजार ५००, वाहन कर न भरलेली २ वाहनांकडून २ हजार, प्रदूषण प्रमाणपत्र नसलेल्या 6 प्रकरणात ४ हजार ५००, अनुज्ञप्ती नसलेल्या १० वाहनचालकांकडून ५ हजार रुपये तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक बसच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ३ प्रकरणात ४२ हजार रुपये असा एकूण ८ लाख ५९ हजार ५०० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत मोहीमस्तरावर वाहनांची तपासणीचे काम सुरु आहे. नागरिक तसेच शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना वाहनचालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



