कृषी सहाय्यक ‘अँटी करप्शन’ च्या जाळ्यात

उत्पन्नाच्या १७ टक्के मालमत्ता; पती-पत्नी विरुद्ध गुन्हा
सोलापूर (बारामती झटका)
ज्ञात उत्पन्नाच्या १७.१४ टक्के संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून कृषी सहाय्यक व सहाय्य केल्याबद्दल पत्नी विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने बुधवारी गुन्हा नोंदला आहे.
काशिनाथ यल्लाप्पा भजनावळे (कृषी सहाय्यक, वय ५०), पत्नी किशोरी काशिनाथ भजनावळे (वय ४५, दोघे रा. सिद्धापूर, ता. पंढरपूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात म्हटले आहे की, कृषी सहाय्यक भजनावळे यांनी भ्रष्ट मार्गाने त्यांचे व त्यांच्या पत्नीच्या नावाने संपादित केलेली अपसंपदा रक्कम १४ लाख ९३ हजार ८१७ रुपये इतकी आहे. लोकसेवक व त्यांच्या पत्नीच्या अज्ञात उत्पन्नाची एकत्रित टक्केवारी काढता ती १७.१४ टक्के आहे. सदरची संपत्ती अपसंपदा आहे, याची जाणीव असूनही लोकसेवकाच्या पत्नीने त्यास सहाय्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनाद्वारे गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी पार पाडली.
चौकशीतून निष्पन्न
लोकसेवकाकडून सदरची अपसंपदा ही मार्च १९९५ ते जुलै २०१४ या कालावधीत मिळवलेली आहे. यासाठी तत्कालीन चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, चंद्रकांत कोळी, विद्यमान पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केलेल्या चौकशीतून समोर आल्याचे म्हटले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.