ताज्या बातम्याराजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीने नेते व कार्यकर्त्यांच्या गावात भेटीगाठी वाढल्या, रुसवे फुगवे काढण्यासाठी खलबते सुरू झाली.

व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रमात गैरहजर असणारे गावात येऊन ख्याली-खुशाली व बळच चहाला बोलावून गप्पा मारण्यात दंग आहेत.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील दहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. गाव-गाड्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने नेते व कार्यकर्त्यांच्या गावात भेटीगाठी वाढलेल्या आहेत. रुसवे फुगवे काढण्यासाठी राजकीय खलबते सुरू झालेली आहेत. अनेक नेते व कार्यकर्ते गावांमधील व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रमात गैरहजर असणारे गावात निवडणूक जाहीर झाल्यापासून गावात, चौकात व पारावर बसून मतदारांची ख्याली-खुशाली, चौकशी सुरू केलेली आहे. एरवी अनेकांच्या तोंडाकडे न बघता गुंगारा देऊन जाणारे बळच चहाला बोलावून गप्पा मारण्यामध्ये दंग झालेले आहेत.

माळशिरस तालुक्यातील माळीनगर, धर्मपुरी, कारूंडे, वाफेगाव, कोंडारपट्टा, दहिगाव, देशमुखवाडी, लवंग, कण्हेर, सवतगव्हाण या दहा गावातील ग्रामपंचायत निवडणूक आहे. थेट जनतेतील सरपंच पदाची निवडणूक असल्याने मतदारांना विशेष महत्त्व आलेले आहे‌. निवडणुकीचा प्रोग्राम सोमवार दि. १६ ऑक्टोंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात आहे. मतदान रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी मतदान आहे. विशेष म्हणजे दीपावलीची सुरुवात ९ तारखेला वसुबारसने होऊन १५ तारखेला भाऊबीज आहे. दिवाळी सणांचा राजा समजला जातो. कितीही गरीब, अथवा कितीही श्रीमंत असले तरी ज्यांच्या त्यांच्या परिस्थितीनुसार दिवाळी साजरी केली जाते. दहा गावातील मतदारांना खुश करून मतदान पारड्यामध्ये घेण्याकरिता मतदारांची दिवाळी थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून दिवाळीपूर्वी मतदारांची दिवाळी होणार आहे.हत्यामुळे दहा गावांची दिवाळी डबल साजरी होणार आहे.

निवडणूक कोणतीही असो गावातील मतदार हुशार आहेत. मत देण्याचे अगोदरच मनामध्ये ठरवलेले असते. अनेकजण कधीच कुणाच्या करंगळीवर मु** नाहीत, असे सुद्धा आपले नशीब आजमावित असतात. अशावेळी हुशार मतदार घावलाय तोवर भाजून काढू, असे म्हणून नवक्या पुढाऱ्याला मोकळ्यात किंमत दिली जाते. मतमोजणीच्या वेळी असे समाजात नसणारे पुढारी मोटरसायकलीवर गावात येताना वाट चुकून व अंधार पडल्यानंतर घरात येतात अशी वस्तुस्थिती आहे.

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या व रंगतदार ठरणार आहेत. काही महिन्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणुक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सध्या गावांमध्ये गटागटाकडून उमेदवारांची चाचणी सुरू झालेली आहे. सरपंच पदाचे उमेदवार नातेवाईकांना व मित्रपरिवार यांना फोनाफोनी सुरू झालेली आहे. आर्थिक सहकार्य करावे लागते. तर दुसरीकडे गावांमध्ये अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. मर्यादित ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेत जागा असल्याने नेत्यांना कार्यकर्त्याची समजूत काढण्यामध्ये दमछाक होत आहे. ज्याच्या घरामध्ये बायका मुले सुद्धा ऐकत नाहीत, असे मतदार चौकात माझ्याच मागे भाऊभाऊकी आहे. ५० ते १०० मताचा गठ्ठा आहे, अशा अविर्भावात गप्पा मारत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीला गाव गाड्यात विशेष महत्त्व असते. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात असावी लागते. यासाठी नेतेमंडळी रात्रंदिवस गावामध्ये ठाण मांडून ग्रामपंचायतची जुळवाजुळव करण्यामध्ये व्यस्त आहेत. खरे चित्र उमेदवारी अर्ज भरून छाननी होऊन माघारी घेईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लोकांच्या पाठीमागे मोकळे मतदार असतात. निवडणुकीचे चिन्ह मिळाल्यानंतर मतदार आपापल्या गटात सामील होतात. अपक्ष उमेदवारांची समोरासमोर लडती मध्ये वाताहात होते आणि अनेकांचे डिपॉझिट जप्त होतात. लोकशाहीमध्ये कोणालाही उभा राहण्याचा अधिकार असल्याने अनेकजण पार्टीतून तिकीट मिळो अथवा न मिळो नशीब आजमावत असतात खऱ्या अर्थाने गावगाड्यातील निवडणूकीत वेगळीच रंगत येत असते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button