ह. भ. प. नवनाथ महाराज लिमण भोर यांचे गोरेवस्ती येथील अखंड हरिनाम सप्ताहातील काल्याचे किर्तन संपन्न होणार…

आमदार राम सातपुते मंगल कार्यालय, बोटिंग क्लब, बाल उद्यान, स्ट्रीट लाईट या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार….
मारकडवाडी (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी तामशिदवाडी सदाशिवनगर सीमेवर असणाऱ्या श्री क्षेत्र वश्या मारुती हनुमान नगर गोरे वस्ती मारकडवाडी येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदाचे 23 वे वर्ष आहे. या अखंड हरिनाम सप्ताहातील आज मंगळवार दि. 27/08/2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचे किर्तन ह. भ. प. नवनाथ महाराज लिमण भोर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. काल्याचे किर्तन झाल्यानंतर आमदार राम सातपुते मंगल कार्यालय, बोटिंग क्लब, बाल उद्यान, स्ट्रीट लाईट या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

वश्या मारुती मंदिर हे हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान बनलेले आहे. गोरे वस्ती येथील स्थानिक व आसपासच्या लोकांनी मंदिराचा जिर्णोद्धार केलेला आहे. लोकवर्गणीतून मंदिराला सभामंडप शिखर तयार करून कळस बसविलेला आहे. गेली अनेक वर्ष नवसाला पावणारा वश्या मारुती अशी ख्याती माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासहित इतर जिल्ह्यातही झालेली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते दर्शनासाठी आल्यानंतर सदरच्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. विधान परिषदेचे तत्कालीन आमदार रामहरी रुपनवर यांनी ‘क’ वर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले होते. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता संजय मोटे यांनी फंडातून पहिला दिवा दिलेला होता. ‘क’ वर्गामध्ये असणारे श्री क्षेत्र वश्या मारुती मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात प्राधान्याने घेऊन मंदिर परिसर विकसित केलेला आहे.


दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाची सुख सुविधा व्हावी यासाठी रस्त्यांचा प्रश्न सोडविलेला आहे. येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी आरो फिल्टर बसविण्यात आला आहे. मंदिराच्या समोर भाविकांना धार्मिक विधी, लग्न व विविध उपक्रमांसाठी भला मोठा सभामंडप उभा केलेला आहे. स्ट्रीट लाईट उभारलेली आहे. दर्शनासाठी व विविध धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या लहान मुलांना करमणूक व्हावी, खेळण्या बागडण्यासाठी बाल उद्यानची उभारणी केलेली आहे.
दिवसेंदिवस वश्या मारुती याची महती जिल्ह्यात, राज्यात नव्हे तर राज्याबाहेर असल्याने पर्यटन स्थळासारखे बोटिंग क्लब उभा करण्यात आलेला आहे. निसर्गरम्य परिसराला हिरवा शालू नेसविण्याचे काम सौ. संस्कृतीताई राम सातपुते यांनी परिसरात 3333 वृक्षारोपण करून परिसर हिरवागार केलेला आहे. आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी व वश्या मारुती भक्त हरिभाऊ पालवे यांनी विशेष सहकार्य करून मंदिर परिसर विकासामध्ये हातभार लावलेला आहे.


अशा सर्व विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी काल्याचे किर्तन व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे श्रीक्षेत्र वश्या मारुती मंदिर समिती हनुमान नगर गोरे वस्ती मारकडवाडी अध्यक्ष श्री. पांडुरंग चोपडे व सचिव ज्येष्ठ नेते गजानन गोरे व समस्त हनुमान नगर गोरे वस्ती व परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.