हेल्मेट सक्ती — पोलिसांची सगळी कामे संपली काय ?
बारामती झटका
२७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी एका तानाजी जाधव मित्राच्या मुलाच्या लग्नात असताना माझा फोन वाजला. लग्नाच्या गर्दीत स्पीकरच्या आवाजात ऐकू येणे शक्यच नव्हते, त्यामुळे घरी गेल्यावर फोन करतो असे म्हणून मी फोन बंद केला. फोन होता आमच्या ट्रॅक्टर चालवणाऱ्या मित्र दामू भगरे याचा. घरी आल्यावर फोन केला तर त्याने सांगितले की, आम्ही नवरा बायको मोटरसायकल वरून येत असताना पाठीमागून पोलिसांनी फोटो काढून मला दंडाची पावतीच एक हजार रुपये भरा म्हणून पाठविली आहे. मी म्हटले कोणाची धडक झाली आहे का ? पोलिसांनी हात केल्यावर थांबला नाहीस का ? त्याने सांगितले हेल्मेट नाही म्हणून दंड केला आहे. मला लक्षातच येईना, हा काय प्रकार आहे. कारण इथले पोलीस चांगले आहेत एकदा ताकीद, सूचना देऊन, नाही ऐकले तर पुढील कारवाई करतात. कारण जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना कामच करता येणार नाही. पोलिसांना तेवढी नजर नक्कीच असते. कोण सरळ मार्गी आहे आणि कोण सराईत आहे, लगेच ओळखतात. नंतर माहिती घेतली तर मुंबईहून २५ नोव्हेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांनी आदेश काढून हेल्मेट सक्ती आणि ती देखील चालक आणि मागे बसणाऱ्यासह दोघांनाही हेल्मेट पाहिजे, असे आदेश आहेत.
वास्तविक, हा कायदा जुना १९८८ सालचा आहे. ३६ वर्षानंतर अचानक कशी काय जाग आली आणि उपरती झाली, समजत नाही. एवढी कधीपासून पोलीस महासंचालक कार्यालय गरीब जनतेच्या जीवाची काळजी करू लागले आहे ? आश्चर्य वाटले. अर्थात त्यांना कोणी सांगितले की, कोणी मागणी केली, काही समजले नाही. कारण सध्या सरकार तर अजून स्थापन झालेले नाही, दुसरा प्रकार किंवा अपेक्षा म्हणजे त्यांना कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यावरती राग काढावयाचा आहे का ? माहिती नाही. कारण या प्रकारांमध्ये पोलीस कर्मचारीच नाही तर सर्वसामान्य जनतेला देखील वेठीला धरल्यासारखे होणार आहे. हा प्रकार म्हणजे वर्गात एका मुलाने खोडी केली म्हणून सगळ्या वर्गालाच शिक्षा करण्यासारखे आहे. अगोदरच देशभरात आणि राज्यात अनेक कारणावरून अस्थिरता असून, लोक अस्वस्थ आहेत, त्यामध्ये आरक्षण, जातीयवाद, निवडणुकीतील राग, भांडणे अनेक विषय आहेत. सदरचा आदेश जारी करताना दोन चाकी वाहनाचे महिन्यात, वर्षात, कोणत्या रस्त्यावर किती अपघात झाले आहेत ? त्यामध्ये किती जणांचा केवळ हेल्मेट नाही म्हणून मृत्यू झाला आहे, याची माहिती घेतली आहे काय ? हेल्मेट सह अपघात होऊन देखील लोक मेले आहेतच की ! सध्या जनता बऱ्यापैकी सुज्ञ झाली आहे, प्रत्येकाला स्वतःची सुरक्षितता कशी घ्यायची, समजते. मागे एकदा अशीच सक्ती केल्यावर जनआंदोलन, प्रचंड विरोध झाला होता. आता पुन्हा उकरून काढून कशासाठी सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे ? अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे तेवढे पोलीस मनुष्यबळ तरी आहे का ? रस्त्यावर अपघात केवळ हेल्मेट नसल्याने झाले आहेत का ? रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमणे, मोकाट जनावरे, कुचकामी सिग्नल यंत्रणा, अनेक कारणे आहेत. त्यावरती अगोदर काम करावे लागेल. दुचाकी हे खरे तर सिटी बाईक म्हणजे शहर मर्यादित म्हणून वाहन निघाले आहे. शहरांमध्ये कोणीही सांभाळूनच गाडी चालवितात. फक्त या गावाहून दुसऱ्या गावाला किंवा हायवेवर वगैरे हेल्मेट वापरावे इतपत समजून घेता येईल. दोघांनीही हेल्मेट घालायचे म्हणजे उतरले की कडेवर लहान लेकरू घेतल्यासारखे अवघडून चालावे लागते, ते सांभाळण्याचे काम वेगळेच, त्यातून आता मोबाईल साठी एक हात गुंतलेला असतो. महिलांना सवय नसते, वृद्धांना त्रास होतो, मुलाचे काय करायचे ? अनेक प्रश्न आहेत त्यामुळे हा थोडासा मनमानी वाटणारा आदेश त्वरित सहानुभूतीपूर्वक परत घ्यावा असे विनंती करून सांगावेसे वाटते. शहराबाहेर हेल्मेट वापरावे अशां सूचना द्याव्यात. प्रत्येक गावात हजारो मोटरसायकली आहेत. तेवढी हेल्मेटे संख्या तरी उपलब्ध आहे का ? हेल्मेट दुकानदाराचे विक्रीची काळजी करण्या ऐवजी जनतेच्या अडचणीचा आणि मनाचा विचार करून आदेश स्थगित करावा, अशी विनंती आहे.
प्रत्येक पोलीस स्टेशनची अवस्था किती दयनीय आहे ? याचा आढावा घ्यावा. समन्स बजावण्यासाठी पोलीस उपलब्ध नाहीत. आमच्याच मंगळवेढा तालुक्यात ८० गावे आहेत तर पोलीस मात्र फक्त ४० ते ५० आहेत, म्हणजे एका गावाला अर्धा अर्धा सुद्धा वाटणीला येत नाही. त्यात पुन्हा बंदोबस्त, कोर्ट कामासाठी, कोणी आजारी, कोणी रजेवर, अनेक अडचणी आहेत. किती गुन्ह्याचे तपास प्रलंबित आहेत ? याची माहिती घ्यावी. आकडे पहावेत. चोरांना पकडायचे, गुन्ह्याचा तपास करायचा की रस्त्यावर बाजारच्या पावत्या फाडायला उभे राहिल्यासारखे थांबायचे ? अशी दयनीय अवस्था पोलिसांची करू नका. त्यातून एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरे असे झाले, कोणाला सोडले की लोक भांडायला येणार. त्या अधिकाऱ्यांनी कोणाकोणाला समजावून सांगायचे आणि उत्तरे द्यायची ? अगोदरच कोणत्याही पोलीस स्टेशनला जप्त वाहने लावण्यासाठी जागा देखील उपलब्ध नाही, इतकी जप्त वाहने पडून आहेत. याचाही विचार व्हावा. पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षकांना सुद्धा अधिकारी असताना हाताखाली शिपाई नाही, म्हणून झेरॉक्स काढण्यासाठी सुद्धा स्वतःला जावे लागते, इतके मनुष्यबळ कमी आहे. त्यातून पुन्हा सारख्या यात्रा, जत्रा, मोर्चे, गर्दी, व्हीआयपी बंदोबस्त, तेवढी माणसेच नाहीत तुमच्या पोलीस खात्याकडे ? अगोदर पोलीस भरती करा, प्रलंबित गुन्हे तपास पूर्ण करा, सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करून आधार द्या. पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाम समजू नका, त्यासाठी माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार साहेब यांचे आदर्श प्रमाणे महाराष्ट्र पोलीस म्हणजे एक कुटुंब समजून प्रेमाची आदराची वागणूक पोलीस कर्मचाऱ्यांना मिळावी, असे सुचवल्यास वावगे ठरू नये.
गरिबांना वर्दीची भीती नाही वाटली पाहिजे, गरिबांना आधार वाटला पाहिजे, याची जाणीव असावी अशी अपेक्षा व विनंती. आपल्या अशा मनमानी म्हणता येणार नाही पण या निर्णयाने पोलीस विरुद्ध जनता असे वातावरण निर्माण होऊ देऊ नका, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. अगोदरच पोलीस खात्याबद्दल जनतेचे मत फारसे चांगले नाही, ते आणखी बिघडवू नका. तसेच मोटरसायकल घेतली म्हणजे फार मोठा गुन्हा केला असे जनतेला वाटू नये, इतपत त्याला सन्मानाची वागणूक मिळावी. कारण ते काही गुन्हेगार नाहीत. त्यामुळे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याचे पालन व्हावे. अशी माफक अपेक्षा व विनंती. तूर्तास इतकेच !
@ ॲड. रमेश दिनानाथ जोशी, मंगळवेढा
मो.नं. ८२७५५०६०५०
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/