क्रीडाताज्या बातम्या

पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे लढतीची चौकशी, प्रा. विलास कथुरे सरांसह पाचजणांची समिती स्थापन.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव तथा हिंदकेसरी पैलवान योगेशदादा दोडके यांची माहिती..

पुणे (बारामती झटका)

अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागात अंतिम लढत पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पै. शिवराज राक्षे यांच्यात झाली. ही कुस्ती पै. पृथ्वीराज मोहोळ याने जिंकली. या कुस्तीच्या निकालावरून गदारोळ झाला. जनमानसात निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे. या कुस्तीच्या चौकशीसाठी कुस्तीगीर संघाने पाच सक्षम तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली असून, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे समितीचे प्रमुख आहेत. ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून १८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव, हिंद केसरी पैलवान योगेशदादा दोडके यांनी दिली.

याबाबत हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. या कुस्तीस पंच म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय पंच नितीश काबीलिये, मॅट चेअरमन म्हणून शासकीय कोच पै. दत्तात्रय माने व साईड पंच विवेक नाईकलब यांची नेमणूक करण्यात आली होती. या कुस्तीच्या निकालावरून बराच गदारोळ निर्माण झाला.

स्पर्धा संपल्यानंतर जनमानसातही निकालावरून नाराजी व्यक्त होत आहे. पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे ही कुस्ती मोहोळ याने जिंकल्याचा आरोप कुस्ती क्षेत्रात होत आहे. या निकालाविरुद्ध पै. शिवराज राक्षे याने आजपर्यंत कोणतीच लेखी हरकत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे नोंदवली नाही. परंतु, समाजात या निकालाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चेचा विचार करता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने याबाबत ५ जणांची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशी समितीत आंतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड (पुणे) व सुनील देशमुख (जळगाव), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू पै. नामदेव बडरे (सांगली) व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे (नाशिक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही समिती वादग्रस्त ठरलेल्या लढतीतील पंचांच्या निर्णयाची सखोल चौकशी करून २८ फेब्रुवारीपर्यंत अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडे सादर करणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button