आय.पी.एस. अधिकारी सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा

मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्र पोलीस दलातील एक नामांकित अधिकारी आय.पी.एस. सुधाकर पठारे यांचे तेलंगणातील एका भीषण अपघातात निधन झाले. श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या नातेवाईकांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेले होते. त्यानंतर त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. प्रवासादरम्यान त्यांच्या गाडीची धडक ट्रकसोबत झाली आणि हा भीषण अपघात झाला. तेलंगणा पोलिसांनी या घटनेची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.
सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आय.पी.एस. अधिकारी होते. सध्या ते मुंबई पोलिसांमध्ये पोर्ट झोनचे डी.सी.पी. म्हणून कार्यरत होते. आपल्या कर्तव्यदक्ष आणि निर्भीड कारभारामुळे ते पोलीस दलात अत्यंत आदरणीय अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
सुधाकर पठारे यांनी स्पर्धा परीक्षा देत असताना १९९५ साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक म्हणून आपली प्रशासकीय सेवा सुरू केली. त्यानंतर १९९६ साली विक्रीकर अधिकारी (वर्ग १) म्हणून त्यांची निवड झाली. १९९८ साली पोलीस उपअधीक्षक (डी.वाय.एस.पी.) म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात आपली निष्ठा आणि प्रामाणिक सेवा अर्पण केली.
त्यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर आणि राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजावली. तसेच, अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर आणि वसई येथे, तर पोलीस अधीक्षक म्हणून सी.आय.डी. अमरावती येथे कार्यभार सांभाळला.
पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई आणि ठाणे शहर येथे कार्य केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवत संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई केली. मोक्का, तडीपारी, एम.पी.डी.ए.सारख्या कडक कायद्यांतर्गत गुन्हेगारांवर धडाकेबाज कारवाई केली.
आय.पी.एस. सुधाकर पठारे यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्र पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कर्तव्यनिष्ठ योगदान आणि गुन्हेगारीविरोधातील धडाडीचे कार्य हे पोलीस दल आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी राहील. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पोलीस दलासह त्यांच्या सहकाऱ्यांत आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.