लेखी खुलासा न दिल्यास गुन्हा दाखल होणार

खडकी जमीन प्रकरणात आठ जणांना सहाय्यक निबंधकांकडून नोटीस
तुळजापूर (बारामती झटका)
खडकी येथील गट क्र. ४१ मधील जमीन बळकावण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून खोटे मुखत्यारपत्राद्वारे खरेदीखत नोंदविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आठ व्यक्तींना सह दुय्यम निबंधक, तुळजापूर यांच्या कार्यालयाकडून लेखी नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत लेखी खुलासा न केल्यास संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे. नांदेड येथील गिरीष पि. अशोकराव दिक्षीत यांनी दि. ०७ नोव्हेंबर रोजी तुळजापूर उपनिबंधक कार्यालयात तपशीलवार तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, मौजे खडकी शिवारातील गट क्र. ४१ क्षेत्र २ हेक्टर ८५ आर ही जमीन त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची असून ७/१२ वर त्यांचे व नातेवाईकांचे हक्क नोंदलेले आहेत. कुटुंब नांदेड व हैद्राबाद येथे वास्तव्यास असल्याने काही स्थानिकांनी संगनमत करून जमीन बळकावण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे
तक्रारीनुसार, कुटुंबातील आजी यमुनाबाई गणपतराव दिक्षीत यांचे निधन २००५ मध्ये झाले असताना त्यांचे नाव ७/१२ वर दाखवून त्यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले गेले. त्यावर आधारीत खोटे कुलमुखत्यारपत्र अजय कमार यादव यांच्या नावावर दि. ३० जून २०२५ रोजी तयार करण्यात आले, असा धक्कादायक आरोप तक्रारदारांनी केला आहे. या खोठ्या मुखत्यारपत्राचा आधार घेत दि. ०८ सप्टेंबर २०२५ रोजी बनावट खरेदीखत दस्त क्र. ५४२१/२०२५ नोंदवून जमीन स्वतःच्या ताब्यात घेतल्याचा आरोप पुढे करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान काही नोंदणी अधिकारी व संबंधित पक्ष यात संगनमत करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या आठ जणांचा समावेश
- झापू लक्ष्मण राठोड, रा. खडकी
- अय्युब राजन पटेल, रा. बोरामणी
- संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा
- अजय कुमार यादव, रा. दिल्ली
- अवंतीबाई सुरेश यादव, रा. जुन्नर
- रेखा चंद्रकांत कुलकर्णी, रा. नवी मुंबई
- नितीन शाम भंडारे, रा. खडकी
- शिवाजी अंबादास जवान, रा. खडकी
तपासासाठी महत्वाचे पुरावे ताब्यात
तक्रारीत नमूद सर्व कागदपत्रांच्या प्रती, आधार क्रमांक, खरेदीखत, मुखत्यारपत्राच्या कथित स्वाक्षऱ्या व नोंदणीची प्रक्रिया यांचा तपशील सध्या सहायक निबंधक कार्यालयाकडे तपासासाठी उपलब्ध आहे.
सात दिवसांत खुलासा अनिवार्य
सह दुय्यम निबंधकांनी नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे की, संबंधितांनी पुराव्यासह सात दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास त्यांच्या विरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र निर्मिती आणि कटकारस्थानाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



