जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-८ – सुलभा सत्तूरवार

पुणे (बारामती झटका)
‘शिवचरित्र कथन’ हाच श्वास व तोच ध्यास असे समजणाऱ्या सुलभाताई एक लेखिका, कवयित्री व व्याख्याता आहेत. इतिहासात एम.ए.बी.एड. असतानाही त्यांना कौटुंबिक परिस्थितीमुळे नोकरी करता आली नाही. त्यामुळे त्यांनी आबाल वृध्दांपर्यंत शिवचरित्र पोहोचवायला सुरुवात केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्त्री अभ्यास केंद्रातून त्यांनी स्त्री समस्याविषयक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या हिंदी पंडीत असून जोतिष होराभूषण ही पदवी सुध्दा त्यांनी प्राप्त केली आहे. एका महिला संस्थेचे त्यांनी १२ वर्ष व्यवस्थापन पाहिले. विविध सेवाभावी संस्था व संघटना, मंडळे या माध्यमातून त्यांनी आजवर शिवचरित्र, संतचरित्र, ऐतिहासिक स्त्रीया याविषयीची १८३ व्याख्याने दिली आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्माला येऊन चार भावंडात त्या वाढल्या. त्यांचे वडील नोकरी करून शिंपी काम करायचे. ताई मुळातच हुशार असल्याने शाळेतील बाईंनीच सांगितले की, दोन इयत्ता गाळून तिसरीत घालता येईल हिला. परंतु वडीलांनी त्याला नकार दिला. वयाच्या मानाने जास्त ओझे नको असे सांगितले. वडीलांना वाचनाची आवड जास्त असल्याने लहानपणापासून लायब्ररी लावून दिल्याने ताईंचे वाचन प्रचंड झाले. वाचन, घरकाम, स्वावलंबन, काटकसर हे संस्कार बालपणीच झाले त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत फटाका स्टॅाल सांभाळणे, वडीलांनी काढलेले छोटेसे किराणा दुकान सांभाळून अभ्यास करणे इ. गोष्टी लहानपणापासूनच केल्या. घरचे व शिक्षकांचे संस्कार जीवनात उपयोगी पडल्याची कृतज्ञता ताई व्यक्त करतात. बी.एड. ची फी भरण्यासाठी कॅालेजात ब्लाऊजपीस विकल्याची आठवण ताई सांगतात. शिक्षिका व्हायचे स्वप्न लग्नाआधीच पूर्ण झाले. समंजस पती मिळाला परंतु इतरांच्या विचित्र स्वभावामुळे दोन जीवांची असतानाच घर सोडावे लागले.
एका खोलीत संसार थाटला. शिक्षक पतीसोबत जेथे बदली होईल तेथे ताईंनी साथ दिली. ताई सुध्दा शिक्षक असताना सासरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुलगी लहान असताना ताईंची विस्तार अधिकारी म्हणून निवड झाली परंतु मुलगी सांभाळायला सासर व माहेर दोन्हीकडून असमर्थता आल्याने ताईंनी ती पोस्ट नाकारली. त्यात त्यांचा व पतीचा अपघात झाला. ताईंचा डाव्या हाताचा कोपरा मोडल्याने ॲापरेशन झाले. दोन वर्ष उपचार सुरु असल्याने ताईंनी एका मुलीवर थांबायचा निर्णय घेतला. यामुळे सासर माहेरचे लोक नाराज झाले. ताईंना खूप बोल लावले. पण ताईंनी मुलीचे भवितव्य पाहून शिक्षकाची नोकरी सोडली व एका महिला संस्थेत व्यवस्थापक म्हणून मानधनावर नोकरी स्वीकारली. तेथेच १२ वर्ष काम केले. त्यामुळे महिलांसाठी कौटुंबिक समुपदेशन, वाचन प्रचार, विविध शाळांमधून प्रदर्शने भरवून पाणी बचत, पर्यावरण जागृती, आजार व उपाय याविषयी प्रबोधन केले. मुलींच्या शिक्षणासाठी पालकांचा दृष्टीकोन यासाठी सुमारे ६०० कुटुंबाच्या मुलाखती घेतल्या. मुलींसाठी छोटी नाटके व गाणी लिहिणे. ती कार्यक्रमात सादर करण्यास प्रोत्साहन देणे असे विविध सामाजिक काम ताईंचे सुरु झाले.
पतीला मधुमेह झाल्याने त्यांच्या डोळ्याचे दोनदा ॲापरेशन करावे लागले तरीही डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. कुठून तरी माहिती मिळाल्याने चेन्नईला जाऊन उजव्या डोळ्याचे ॲापरेशन केल्याने ६५% दृष्टी राहिली. ताईंच्या २४ वर्षांच्या संसारात २२ वर्ष त्यांनी पतीचे आजारपण व पथ्यपाणी सांभाळले. पती अत्यंत समंजस व कर्तव्यदक्ष होते. मुलगी इंजिनिअर झाली आणि पतीचे वयाच्या ५१ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यानंतर नातेवाईकांचे खरे स्वरूप समजले. पती निधनानंतर सौभाग्यलेणी काढायची सक्ती झाली पण मुलगी ठामपणे ताईंच्या मागे उभी राहिली. त्यामुळे या प्रथांना ताईंनी व मुलीने विरोध केला. मुलीच्या लग्नातही सारे विधी ताईंनी स्वतः केले. आई व बाबा दोन्ही भूमिका ताईंनी निभावल्या. सुरुवातीपासूनच विधवा, घटस्फोटित व एकल महिलांसाठी ताईंनी कायमच हळदी कुंकू समारंभ केले. कष्टकरी महिलांसाठी ‘एक थाप कौतुकाची’ हा उपक्रम राबवला. ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे यात सतत प्रबोधनपर व्याख्याने ताई करतात. या सर्व प्रवासात जोडलेली अनेक माणसे ही आयुष्यात हिरवळीसारखी जपली.
आयुष्याविषयी ताई कृतज्ञ आहेत ते व्यक्त करताना ताई म्हणतात,’ अनेक कसोटीचे क्षण आले, काही वेळी अग्निपरीक्षा द्यावी लागली, अंधारातून, काट्याकुट्यांतून वाट काढावी लागली पण हिंमत हरली नाही. आई वडील व सासू सासरे यांना विसरले नाही. प्रतिक्षणी पतीची प्रतिमा मनी जपली आणि आजही पतीनिधनानंतरही त्यांची सौभाग्यवती म्हणून मानाने म्हणवते व लिहितेही..!’
ताईंनी त्यांचा ‘चांदणफुले’ हा काव्यसंग्रह पतीलाच समर्पित केला आहे. त्याला ५ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच ताईंनाही सामाजिक कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज लेक जावई व नातवासह यशाचा आनंद उपभोगताना ताई सामाजिक भान जपत आपले व्याख्यानातून मिळालेले मानधन सामाजिक कामाला खर्च करत आहेत. उपेक्षित वंचित घडतांना मूठभर देऊन समाधान गाठीशी बांधत आहेत. कोणत्याही संकटात दृढ आत्मविश्वास व कर्माची पुण्याई उपयोगी पडते ही ताईंची धारणा आहे.
अशी कितीही संकटं आली तरीही शांतपणे आपल्या कर्मावर विश्वास ठेवत पुढे वाटचाल करणाऱ्या शिवचरित्र हाच श्वास व ध्यास मानणाऱ्या व अंगीकारणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



