जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – ३ – प्रा. डॉ. क्रांती मोरे
पुणे (बारामती झटका)
लातूर जिल्ह्यातील रेणापूरला गेल्या २५ वर्षापासून इंग्रजी विषयाची प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारी प्रा. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोरे. तिने ३/४ वर्षांपूर्वी ‘हक्कसोड पत्र’ या विषयी एक भावनिक पोस्ट लिहिल्याने ती वाचून मी तिच्या प्रेमात पडले. त्यानंतर तिच्या अंगी असलेले अनेक कलागुण मला तिच्याकडे आकर्षित करत गेले. तिचे लेखन, काव्य, विचार, नृत्य, व्यवसाय, सामाजिक काम, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, ती आयुष्यात घेत असलेला भटकंतीचा अनुभव व आनंद, मध्येच पतीबरोबर करत असलेले रील्स, तिचे विविध फोटो.. सारंच अप्रतिम..! हे पहात असताना तिची वैचारिक मैत्री झाली.
आई वडील दोघेही सीनियर कॉलेजला प्राध्यापक, नंतर प्राचार्य होऊन रिटायर झालेले. त्यामुळे ताईंची शैक्षणिक वाटचाल उत्तम झाली. आई-वडीलांचा वसा आणि वारसा घेऊन फक्त पगारापुरती नोकरी न करता कर्तव्य आणि समाजाप्रती ऋण फेडण्याची भूमिका ठेवून ती कार्यरत आहे. डाव्या विचारसरणीचा प्रभाव आणि वडील पूर्णवेळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याने तिची जडणघडण त्याच मुशीत झाली. महिलांच्या संघटनांमधून काम करत असताना समाजातील अनेक प्रश्नांची जाणीव व ते सोडवण्याचे मार्गदर्शन तिला घरातूनच मिळाले.
अनेक ठिकाणी कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे, अध्यक्ष म्हणून जाताना कुठल्याही पद्धतीचे मानधन न घेता ही समाजाप्रती असणारं आपलं ऋण फेडण्याचा त्या सतत प्रयत्न करतात. विविध महिला चळवळी, बचत गट, डाव्या विचारसरणीचे आणि पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणाऱे कार्यक्रम यात त्या सहभागी असतात. साहित्यिक म्हणून विविध विषयांवर व्याख्याने, पुरोगामी व क्रांतिकारी कवितांचे लेखन गेली २० वर्ष त्या करत आहेत. कवी संमेलन, साहित्य संमेलनातही ताईंचा सहभाग असतो. धर्मांधता, जातीयता, लिंगभेद या गोष्टी जेथे आढळतात तेथे त्या योग्य अशीच भूमिका त्या कायम घेतात. प्रबोधनपर फेसबुक लाईव्ह, पेपरमधून लेखन, ब्लॉग लेखन अशा सगळ्या विषयांवर ताई व्यक्त होतात. प्रवास करताना तिथलं सर्वसामान्यांचे जनजीवन अभ्यासणे आणि त्यावरती प्रवासवर्णन लिहिणे हाही त्यांच्या आवडीचा छंद..!
अनेक विषयांची आवड असल्यामुळे ‘हर हायनेस ब्रायडल बुटीक’ या युनिक व्यवसायात ताई गेली २५ वर्ष कार्यरत आहेत. चांगल्या पद्धतीचे राहणीमान त्यांच्या आवडीचा विषय असल्यामुळे लातूर सारख्या ठिकाणी महिला व मुलींना एकाच ठिकाणी शिवण, भरतकाम, विणकाम, साड्या, विविध पद्धतीचे ड्रेस या सगळ्यांच्या सोयीसाठी त्यांना परवडेल अशा आणि युनिक पद्धतीच्या अनेक गोष्टी एकत्रित करून अतिशय वेगळ्या पद्धतीचे बुटीक ताई चालवत आहेत. यातून विविध घटकातील अनेकांना ताईंनी काम सुद्धा दिले आहे. अशी अनेक कुटुंब उभी राहिलेली बघताना ताईंना मनस्वी आनंद मिळतो. गेल्या दोन वर्षांपूर्वी ‘ए.एस.के. फाउंडेशन’ नावाची संस्था रजिस्टर करून त्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल कोर्सेस सहा महिने व एक वर्षासाठी चालवले जातात. पदवीचे शिक्षण घेत असतानाच सध्याच्या काळाची गरज ओळखून, तरूण मुले मुली, महिलांनी विशिष्ट स्किल जर अंगीकारलं तर व्यवसायाच्या अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. पैसे भरण्याची ज्यांची परिस्थिती नाही त्यांना जे येतं ते काम देऊन, त्यातून कोर्सेस शिकवले जातात तर काही मुलींना बुटिकमधेच काम दिले जाते.
विविध पातळ्यांवर काम करत असताना ताई पूर्ण भान राखून काम करतात. विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देणारी एक यशस्वी प्राध्यापक म्हणून आदर्श प्राध्यापक पुरस्कारही ताईंना मिळालेले आहेत. व्यवसाय करत असताना नॉलेज आणि स्किल याची सांगड घातली तर शंभर टक्के यश कसं मिळेल याची माहिती विद्यार्थ्यांना देत त्यांचं व्यावसायिक प्रशिक्षण नीट पूर्ण होईल याकडे ताईंचा कल असतो.
त्यांची वैचारिक स्वतंत्र अशी वेगळी भूमिका असते. त्यांना न पटणाऱ्या वेगळ्या विचारांच्या कार्यक्रमांचं बोलावणं त्या नम्रपणे नाकारतात. हे सगळं करत असताना ताई त्यांच्या इतर सगळ्या कलागुणांनाही सतत वाव देत असतात. खरंतर नावाप्रमाणेच क्रांती म्हणजे बदल, ही सतत ताईंना आवडणारी गोष्ट. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कुठल्याच एका गोष्टीत अडकून न रहाता सतत आनंदी रहात जीवनाचा अतीव आनंद घेतात. तुम्ही आस्तिक की नास्तिक हा प्रश्न ताईंना विचारला तेव्हा अगदी ठामपणे ‘मी नास्तिक आहे’ असे ताई सांगतात. ‘तुमची कुणावर श्रद्धा नाही का ?’ त्यावेळी माझी श्रद्धा फक्त माझे विचार आणि माझे आईवडील या दोघांवरच आहे असे त्या सांगतात. समाजात राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडतात, यावर योग्य ती भूमिका घेऊन ताई व्याख्याने, कार्यक्रम, लेखन सातत्याने करतात. कुठल्याही कारणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ताई योग्य ती मदत त्यांना करतात. विविध सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना त्या भरीव मदत करतात.
ताईंचे लव्ह मॅरेज त्यातही आंतरजातीय ! हे सांगताना ताई जुन्या आठवणीत रमल्या. ‘घरच वातावरण पुरोगामी असल्याने आंतरजातीय विवाहाचा त्रास झाला नाही. दोघांनी स्वावलंबी व्हायचं ठरवल्यामुळे कुणाचीही मदत न घेता, कसलीच पार्श्वभूमी नसताना नवीन व्यवसायात उतरलो आणि यशस्वीही झालो. सुरवातीला अडचणींना तोंड द्यावे लागले पण अडचणी पार केल्या तरच यशस्वी होता येते हे मनाशी पक्कं होतं त्यामुळे आम्ही १०x१० च्या दुकानातून २००० sq ft .च्या हॉलपर्यंत पोहचू शकलो. याच दुकानाचे रूपांतर एका इन्स्टिट्यूटमध्ये केले. नोकरी व व्यवसायात वेगळा ठसा उमटवत कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर तसेच सामाजिक स्तरावर आज कार्यरत आहे.’
आजपर्यंत ताईंच्या मार्गदर्शनाखाली दोन विद्यार्थ्यांना Ph.D. ही पदवी प्राप्त झालेली आहे . एका व्यक्तीने किती बहुआयामी असावे हे पहायचे झाले तर ताई उत्तम स्वयंपाक, उन्हाळीकाम, नृत्य, विणकाम, भरतकाम, ड्रायव्हिंग, टिचिंग, व्याख्याने, लेखक, कवी, साहित्य संमेलने, संस्थेची अध्यक्ष या सगळ्याच गोष्टी अतिशय आनंदाने पार पाडताना दिसतात. इतकेच नव्हे तर आपल्या पतीसोबत जीवनाचा अतीव आनंद घेत असल्यामुळेच कुठल्याही क्षेत्रांमध्ये काम करताना त्यांना कधीच नैराश्य येत नाही. त्या सतत पॉझिटिव्ह विचार करतात म्हणूनच त्यांची एनर्जी कायम टिकून असते.
घरात पूर्णपणे मार्क्सवादी किंवा डाव्या विचाराचे वातावरण असतानाही जगरहाटीला सामोरे जाताना वडिलांच्या निधनानंतर येणाऱ्या कौटुंबिक समस्यांना ताई सामोऱ्या गेल्या. यावर त्यांनी मत मांडण्याचे धाडस फेसबुकच्या माध्यमातून केलं. त्यामुळे हक्कसोड पत्र निर्णयावर ज्या महिला सह्या करतात त्या कित्येकींच्या भावना त्या निमित्ताने व्यक्त होऊ शकल्या. ‘पहिली बेटी धन की पेटी, मुली आपल्या घरच्या लक्ष्मी असतात, हे बोलणारा समाज मात्र कितीही सुशिक्षित, पुरोगामी, पुढारलेला असला तरी खऱ्या अर्थाने मुलीला मुलांच्या बरोबरीची वागणूक देताना दिसत नाही. त्यामुळे मुलींचं हे भावनिक नातं सामाजिक स्तरांमध्ये समानतेचे व्हावे अशी माझी इच्छा आहे. यासाठी प्रबोधनपर कार्यक्रम करण्याचा माझा मानस आहे. स्त्री कुठेही कमी नाही असं म्हणत जिथे त्या जन्म घेतात तिथेही त्यांना दुय्यमच समजले जाते ही शोकांतिका आहे.’ अशी खंत त्या व्यक्त करतात. पुरूषाच्या बरेबरीने काम करणारी, स्वकर्तृत्वाने समाजाला तोंड देणारी, यशाची शिखरं पादाक्रांत करणारी महिला सुद्धा आजही या मानसिक अत्याचाराची बळी होत आहे. नाती तुटतील म्हणून ती कुठेही व्यक्त होत नाही. ज्या महिला याविरोधामध्ये पाऊल उचलतात तिला समाज वाईट, बंडखोर ठरवतो. कोणतीही स्त्री स्वतःहून कोर्टाची पायरी चढत नाही. पण तिने हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ती कशी विकृत व चुकीची आहे हे सिद्ध केले जाते. समाजाच्या मानसिकतेत बदल व्हावा यासाठी व महिलांच्या न्याय, हक्कासाठी त्या कायमच कटिबध्द आहेत.
अशा या कर्तबगार, बंडखोर, प्राध्यापिका व समाजशिक्षक असलेल्या जिजाऊ- सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.