जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकेसाठी काम करायला मिळाले हे माझे भाग्य – शैलेशजी कोतमिरे

अकलूज (बारामती झटका)
अकलूज, माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वतीने अपर आयुक्त व विशेष सहकारी संस्था निबंधक शैलेशजी कोतमिरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ अकलूज शाखेत घेण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने अप्पर आयुक्त शैलीशजी कोतमिरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना अप्पर आयुक्त व विशेष सहकारी संस्थांचे निबंध शैलेशजी कोतमिरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा बँकेमध्ये मला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे येथील शेतकऱ्यांसाठी मला काम करता आले, हे माझं भाग्य आहे. माझ्याच जिल्ह्याची बँक अडचणीत असताना पहात बसणे हे मला न पटणारे होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप न करण्याच्या अटीवर मी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदाची जबाबदारी स्वीकारली. सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले व बँक डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला. त्याला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत चांगले काम केले. शाखा पातळीवर सर्व अधिकार दिले. ठेवी गोळा केल्या, बंद असलेले कर्ज वाटप चालू केले, 1265 विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी 128 सोसायट्यांना कर्ज वाटप चालू केले व इतर संस्थांना थक कर्ज वसुल करायला सांगितले. आज बँकेचे 210 कोटीचे वाटप आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त कर्ज वाटप व वसुली माळशिरस तालुक्यातून आहे. माळशिरस तालुक्याची वसुली अतिशय चांगली आहे, याचा मला अभिमान आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी सचिव यांनी मनापासून काम केल्यामुळे आज बँकेला चांगले दिवस आले आहेत. मी तयार केलेला बँक डेव्हलपमेंट प्लॅन हा अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळेच यशस्वी झाला, हे सर्व त्यांचे यश आहे.
सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यामुळेच मी “असाध्य ते साध्य करिता सायास – कथा एका बँकेची” हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक नसून एक डॉक्युमेंट आहे. महाराष्ट्रातील अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना त्याचा फायदा होईल. माळशिरस तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी माझा सत्कार केला. घरच्या व गावातील लोकांनी माझा सन्मान केला, हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, असे शैलेशजी कोतमिरे म्हणाले.

यावेळी प्रास्ताविक करताना अकलूज सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंध मोहन शिंदे म्हणाले, अप्पर आयुक्त शैलेशजी कोतमिरे यांनी महाराष्ट्रातील अनेक अडचणीत असणाऱ्या जिल्हा बँकांना अडचणीतून बाहेर काढले आहे. परिसाप्रमाणे काम करून अनेकांच्या जीवनात आनंद फुलविला. सहकार विभागामध्ये चांगले काम करून मित्राप्रमाणे सर्वांना प्रेम दिले. जिद्द, चिकाटी, कष्ट व मेहनतीच्या जोरावर अशक्य ते शक्य होतं, हे कोतमिरे साहेबांनी दाखवून दिले.
यावेळी अकलूज सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक मोहन शिंदे, सीनियर बँक इन्स्पेक्टर उत्तमराव दीक्षित, मृणाल गायकवाड, आनंदनगर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत माने पाटील, बिजवाडी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र शिंदे, विठ्ठलवाडी सोसायटीचे चेअरमन तानाजी देशमुख, सचिव निंबाळकर, अकलूज शाखेचे माजी शाखाधिकारी प्रदीप नागटिळ,क नागेश सुरवसे, अशफाक मुलाणी आदीसह माळशिरस तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले तर, सीनियर बँक इन्स्पेक्टर मृणाल गायकवाड यांनी आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.