जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली

माळशिरस तालुक्यात अवघा ८२ टक्के पाऊस तर, जिल्ह्यात ५७२ मिमी पाऊस
सोलापूर (बारामती झटका)
जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाने वर्षभराची सरासरी ओलांडली आहे. केवळ माळशिरस तालुक्यात आतापर्यंत ८२ टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ४८१.१ मिमी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सोमवार सकाळपर्यंत ५७२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासून पाऊस पडत आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यात काही तालुक्यांत कमी पाऊस झाला, मात्र सरासरी ओलांडत पावसाची बॅटिंग झाली. सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला एक-दोन दिवस पाऊस पडला, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. महालक्ष्मी व गणपती उत्सवाच्या काळात पाऊस गायब झाल्याची शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.
मात्र, मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात जरी पुरेसा पाऊस पडला नसला, तरी यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत १० तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. माळशिरस तालुक्यात मात्र सरासरी इतकाही पाऊस पडला नाही. माळशिरसमध्ये आतापर्यंत सरासरीच्या ८२.५ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांत मात्र सरासरी व त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात उर्वरित आठ दिवस, तसेच २ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आठवड्यात पाऊस पडला, तर तो पाऊस अधिकचा ठरणार आहे.
सोमवारपासून परतीचा पाऊस…
सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षीचा अपवाद सोडला, तर दरवर्षी परतीचा पाऊस जोरदार बॅटिंग करतो. याही वर्षी परतीचा पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आणखीन २० हून अधिक दिवस पावसाचा मुक्काम राहील, असे सांगण्यात येते. साधारण दरवर्षी उत्तरा व हस्त नक्षत्रात पाऊस पडतो. हस्त नक्षत्र २६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
तालुका सरासरी प्रत्यक्ष टक्के
उ. सोलापूर ५५२ ५९१ १०७
द. सोलापूर ५३६ ५३९ १००.५
बार्शी ५२८ ७४६ १४१
अक्कलकोट ५४३ ५६८ १०५
मोहोळ ४५७ ६५२ १४८
माढा ४७५ ६३८ १३४
करमाळा ४५८ ६९३ १३२
पंढरपूर ४८९ ५४४ १११
सांगोला ४६८ ५४६ ११६
माळशिरस ४२७ ३५२ ८२.५
मंगळवेढा ४३४ ५२६ १२१
एकूण ४८१.१ ५७२.८ ११९.१
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा