जिल्ह्यातील इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा विठ्ठलराव शिंदे प्रति टन एक रुपया ज्यादा दर देणार – आमदार बबनदादा शिंदे

दहा दिवसाला बँकेत बिल जमा होणार, कामगारांना दोन महिन्याचा पगार बोनस म्हणून जाहीर, दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रति टन हप्ता देणार, 47 हजार शेतकऱ्यांना घरपोच साखर वाटप चालू -आ. बबनदादा शिंदे
माढा (बारामती झटका)
येत्या 2024 -2025 हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील कोणत्याही इतर साखर कारखान्यापेक्षा एक रुपया तरी ज्यादा दर देणार असून पूर्वीप्रमाणेच प्रत्येक दहा दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले जाणार आहे. मागील वर्षी गळीतास आलेल्या उसाला आतापर्यंत कारखान्याने 2800 रुपये प्रति टन दर दिला आहे, दीपावली सणासाठी शंभर रुपये प्रति टन दर देण्यात येईल. कामगारांना दिवाळी सणानिमित्त दोन महिन्याचा पगार (16.66%) बोनस म्हणून देण्यात येईल, तसेच 47 हजार शेतकऱ्यांना 50 किलो प्रमाणे दिवाळीसाठी घरपोच साखर वाटप सध्या चालू असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. कारखान्याच्या 25 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते. व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, जनरल मॅनेजर सुहास यादव यांच्यासह सर्व संचालक व विभाग प्रमुख उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व स्वर्गीय विठ्ठलभाऊंच्या प्रतिमा पूजनानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी आर्थिक वर्षातील अहवालाचे वाचन केले. यावेळी सर्व 19 विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली. जादा टनेज उत्पादन घेणाऱ्या 11 शेतकऱ्यांचा शाल, सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, मागील 23/24 हंगामात विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर युनिट एक मध्ये 18 लाख 92 हजार तर करकंब ता. पंढरपूर, युनिट दोन मध्ये सहा लाख 25 हजार असे एकूण 25 लाख 18 हजार टन ऊस गाळप करण्यात येऊन 25 लाख 30 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.
दोन्ही युनिटमध्ये सहवीज निर्मिती प्रकल्पातून दहा कोटी 41 लाख युनिट वीज एक्सपोर्ट केली. तर दोन्ही ठिकाणच्या आस्वानी प्रकल्पातून चार कोटी चाळीस लाख लिटर इथेनॉल विक्री केले असून 50 लाख लिटर अद्यापही शिल्लक आहे. मागील हंगामात फेब्रुवारी मधील उसाला पन्नास रुपये प्रति टन तर मार्चमध्ये 100 व 150 रुपये प्रति टन जादा दर दिलेला असल्यामुळे शेतकऱ्यांना 2950 रुपये व 3050 रुपये प्रति टन दर आतापर्यंत मिळालेला आहे. तसेच मागील गळीत हंगामातील उसाला एफआरपी पेक्षा 300 ते 325 रुपये प्रति टन दर जास्त दिलेला आहे.
आगामी गळीत हंगामाविषयी माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, कारखान्याकडे 30 लाख एकर उसाची नोंद आहे. दहा हार्वेस्टर्स, ८०० बजाट, १००० बैलगाड्या व एक हजार ट्रॅक्टर्स आणि ट्रक्स यांचे करार पूर्ण केले असून त्यांना शंभर कोटी रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे. पिंपळनेर युनिट एक हे 14 हजार मेट्रिक टन प्रतिदिन तर करकंब युनिट दोन हे पाच हजार पाचशे मेट्रिक टन प्रतिदिन प्रमाणे गाळप करणार आहे.
अधिक बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने एफआरपी मध्ये वाढ केलेली नाही. साखरेची किंमत आहे तीच आहे. केंद्र व राज्य सरकारने साखरेची किंमत ३८०० ते ४००० रुपये क्विंटल पर्यंत करावी.
कारखानदारीतील स्पर्धा निकोप असावी, कारखाना वाचवून शेतकऱ्यांना दर द्यावा, कर्ज काढून कर्जाचा डोंगर उभारून उसाला दर देणे म्हणजे थोड्याच कालावधीत कारखाना दिवाळखोरीत आणणे हे सर्वांनी जाणून असावे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे आर्थिक नेटवर्क भक्कम असून मागील वर्षीच्या नफ्यावर सतरा कोटी तर यावर्षीचा सहा कोटी रु. टॅक्स सरकारला भरला आहे. आजपर्यंत दिले असेच सहकार्य देऊन आगामी 2024/2025 गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व साथ द्यावी. – आमदार बबनदादा शिंदे
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक सचिन देशमुख यांनी केले. या कार्यक्रमास हजारो सभासद, कर्मचारी, अधिकारी व गावोगावचे शेतकरी आवर्जून उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा