काळज येथे एसटी बस थांबवण्याचा प्रश्न निकाली!

मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी तात्काळ सोडवला प्रश्न;
ग्रामस्थांनी आगार प्रमुखांचेसुद्धा मानले आभार!
काळज (बारामती झटका) वसीम इनामदार यांजकडून
काळज, ता. फलटण पुणे-पंढरपूर या महामार्गालगत वसलेले हे गाव. या गावातून काळज, तडवळे, डोंबाळवाडी, मुरूम, घाडगेमळा, नांदल व सासवड या गावातून असंख्य प्रवासी व विद्यार्थी प्रवास करत असतात. परंतु अनेक एस. टी. बस काळज या ठिकाणी थांबत नसल्यामुळे प्रवाशांची खूप गैरसोय होत होती. यासाठी काळज गावचे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील यांनी काळज येथे एसटी बस थांबवण्यात यावी या संदर्भात ग्रामपंचायतीचे मागणी पत्र दिले होते. परंतु याकडे फलटण आगाराकडून दुर्लक्ष होत होते. या संदर्भात मागील दोन दिवसात अनेक प्रसार माध्यमातून सुद्धा बातम्या प्रसारित झाल्या होत्या.
परंतु, काल काळज, तडवळे, डोंबाळवाडी व पंचक्रोशीतील इतर गावातील कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांची समक्ष भेट घेतली. व सर्वांनी मिळून हा प्रश्न खासदार साहेब व आमदार साहेब यांच्या समोर मांडला. त्यावेळी खासदार साहेबांनी त्वरित आगार प्रमुखांना फोन करून फलटण डेपोच्या सर्व गाड्या काळज येथे थांबवण्याच्या सूचना केल्या व आगार प्रमुख वाघमोडे साहेबांनी सुद्धा याला अतिशय चांगला प्रतिसाद देत हा प्रश्न त्वरित सोडवला व डेपोतील या मार्गावरील सर्व वाहक-चालक यांना सूचना करण्यात आल्या आहेत.
यावेळी तडवळे गावचे चेअरमन सिराजभाई शेख, युवा नेते अमोल खराडे, मा. उपसरपंच सचिनकुमार गाढवे, लक्ष्मण शिंदे, नंदकुमार गाढवे, सतिश गाढवे, संजय गाढवे, भिमराव गाढवे, विकि कुंभार, तुषार पिसाळ, धर्मेंद्र भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
तरी काळज व पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थी यांचा हा गंभीर प्रश्न सुटला. त्यामुळे सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व आगारप्रमुख श्री. राहुल वाघमोडे साहेब यांचे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सर्व प्रसार माध्यमांनी हा गंभीर प्रश्न उचलून धरल्यामुळे हा प्रश्न सुटण्यासाठी आणखी बळ मिळाले, त्याबद्दल सर्व प्रसार माध्यमांचेही नागरिकांनी आभार मानले आहेत.
विशेष सूचना : काळज बस स्टॉप वर फलटण-स्वारगेट नॉन स्टॉप एसटी बसेस थांबणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच याव्यतिरिक्त कोणतीही फलटण डेपोची बस काळज स्टॉपला थांबली नाही तर आपल्या गावातील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी किंवा फलटण डेपोशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



