कलेने आयुष्य संपन्न होईल पण, स्वप्नपूर्तीसाठी सातत्य ठेवा – नाटककार तुषार भद्रे
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ युवा महोत्सवात छत्रपती शिवाजी कॉलेजने मिळविली जनरल चॅम्पियनशिप…
सातारा (बारामती झटका)
कोरोना काळात वाचन करताना मला एक पाश्चिमात्य कवयित्रीची कविता वाचायला मिळाली ‘मला फक्त जीवंत रहायचं नाहीये, मला जगायचं आहे.’ या ओळींनी विचार करण्याची नवी दृष्टी मला मिळाली. जगात जीवंत तर अनेक लोक असतात पण ते ते जगत नाहीत. तुम्हाला कलेचा अनुभव जीवन समृद्ध करणारा ठरेल. नुसते युवा महोत्सव पुरते मर्यादित राहू नका. महाराष्ट्रात, देशभरात नाव होईल, अशी कला सादर करा. केवळ बक्षीसाच्या आशेने काम करू नका. कलेमधून तुमचं आयुष्य समृद्ध व्हावं. कलेत,तुमचा तुमचा कॅनव्हास मोठा असायला हवा. ड्रीम असेल तर आयुष्य आहे, ड्रीम नसेल तर आयुष्य नाही. कलेतून आयुष्य संपन्न होईल, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रकारचे सातत्य ठेवा’, असे विचार सातारा येथील रंगकर्मी नाटककार तुषार भद्रे यांनी व्यक्त केले. ते येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात आयोजित केलेल्या युवा महोत्सवात पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी, प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी.एन. पवार, विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. डी. डी नामदास, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे, प्रा. डॉ. मनीषा पाटील, सांस्कृतिक समन्वयक राजेंद्र संकपाळ, प्रा. डॉ. रोशनआरा शेख, प्रा. डॉ. सुभाष वाघमारे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
कलावंताने काय करायला पाहिजे हे सांगताना ते पुढे म्हणाले की, “आपण कलावंत आहोत, आयुष्य जगायचे असेल तर शरीराचा वारा करायला पाहिजे. बोलण्याचे गाणे करायला यायला पाहिजे. बोलायला लागल्यानंतर समोरचा माणूस ऐकत राहायला पाहिजे. तुमच्या बोलण्याची मैफिल झाली पाहिजे, तरच जिवंत राहणे आणि जगणे म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. कला माणसाला नुसते जीवंत ठेवत नाही, तर ती माणसाला जगायला शिकविते. कर्मवीर अण्णा जगले म्हणून आज आपण इथे उभे आहोत. झोपडीपर्यंत शिक्षण गेले म्हणून आय.ए.एस. अधिकारी तयार झाले. म्हणून हे विश्व आपण बघत आहोत. भली मोठी माणसे तयार झाली कर्मवीरांच्या छायेखाली. आपण येतो तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला घ्यावे लागते. अलीकडची मुले म्हणतात आज आदर्श कुठे आहे ? खरे तर आदर्श आपल्या आजूबाजूलाच असतात. आपण शोधत नाही. कला ही तुम्हाला जगायला शिकवेल असे ते म्हणाले.
प्रारंभी कला आणि आयुष्य संबंधावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘आयुष्य जगत असताना तुम्हाला आयुष्याचा लय, ताल, सूर समजावा लागतो. यासाठी कलेशी आपला सबंध असलाच पाहिजे. तुम्ही लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य करता तेव्हा शरीराला एक लय मिळते. लयीत बसले पाहिजे, चालले पाहिजे, शास्त्रीय गायन शिस्तीचा प्रकार आहे. या गायनाने आयुष्याला शिस्त लागते. तुम्ही नकला, नाटक, लघुनाटिका, प्रहसन करता तेव्हा तुम्ही तुमचे राहिलेले नसता तर तुम्ही परकाया प्रवेश करत असता. तुषार भद्रे नाटक का करतो ? तुषार भद्रेला नाटक का आवडते ? तर, एका आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याची संधी फक्त नाटककाराला मिळते. एका नाटकात मी शास्त्रज्ञ असतो, दुसऱ्या नाटकात मी भिकारी असतो, तिसऱ्या नाटकात मी प्राध्यापक असतो, चौथ्या नाटकात मी राजा असतो. म्हणजे मी प्रत्येक नाटकात परकाया प्रवेश करत असतो. मी रंगमंचावर काम करतो तेव्हा त्या भूमिकेचा स्वीच ऑन करतो व तुषार भद्रेचा स्वीच ऑफ करतो. भूमिका संपली की विंगेत जातो, तिथे भूमिकेचा स्वीच ऑफ करतो आणि तुषार भद्रे ऑन होतो. जीवनाच्या रंगमंचावर भूमिकेचा स्वीच ऑन करायचा असतो आणि भूमिकेतून बाहेर पडले की ऑफ. आयुष्यात आपल्याला अनेक प्रसंगाला सामोरे जावे लागते. उद्याच्या आयुष्यात मी ज्या ठिकाणी आहे तिथे जिथे विश्वासाने काम करता येईल तिथे स्वीच ऑन करावा. जे अजिबातच मला जमत नाही तिथे ऑफ करावा. आयुष्याच्या अनेक वळणावर स्वीच ऑन ऑफ करावे लागतात. आज हे नीट न कळल्याने तुमच्या पिढीत डिप्रेशन वाढले आहे. पेशन्स संपत चालले आहेत. जीवन १६ सेकंदाच्या रीलवर आले. थियटर आणि लाईफ तसे वेगळे नाही. रंगमंचावर तुम्ही प्रतिसृष्टी निर्माण करता. प्रेमात पडलो, प्रेम भंग पण झाला.. पण आमच्या काळात ब्रेकअप पार्ट्या होत नव्हत्या. तुमच्या काळात हे जास्त घडते आहे. म्हणूनच केवळ महोत्सव करण्यासाठी कला करू नका आयुष्य चांगले जगण्यासाठी कलेचा सदुपयोग करा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारितोषिके घेत असताना जल्लोष व्यक्त केला. लावणी नृत्य, लोक नृत्य, समूहगीत, लघुनाटिका, मूकनाट्य, नकला इत्यादी सांघिक व वैयक्तिक स्पर्धांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आनंद घेतला. या युवा महोत्सव स्पर्धेत भरीव कामगिरी करून छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कलावंत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची जनरल चम्पियानशिप मिळवली आणि नृत्य करीत एकच जल्लोष व्यक्त केला. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. राजेंद्र तांबिले व डॉ. विद्या नावडकर यांनी केले. युवा महोत्सव आयोजन चांगले केल्याबद्दल विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालीक डॉ. मनीषा पाटील यांनी सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.