आईसह दोन मुले बेपत्ता, पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल…

माळशिरस (बारामती झटका)
उंबरे दहीगाव ता. माळशिरस येथील ऊस ट्रॅक्टर ड्रायव्हर दत्तात्रय हरिश्चंद्र पारसे यांची पत्नी सोनाली, मुलगी अनुजा व मुलगा श्रीराज हे दि. ६/३/२०२४ पासून बेपत्ता आहेत. बेपत्ता झाल्याची तक्रार दत्तात्रय पारसे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात दिली आहे. माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दत्तात्रय पारसे (वय ३५) यांचे मूळ गाव फोंडशिरस असून ते सध्या उंबरे दहिगाव येथे राहत आहेत. दत्तात्रय पारसे यांची पत्नी सोनाली, मुलगी अनुजा आणि मुलगा श्रीराज यांच्यासह पत्नीच्या माहेरी उंबरे दहिगाव येथे गेली चार वर्षांपासून राहत आहेत. मजुरी करून ते कुटुंबाची उपजीविका करतात. दि. ६/३/२०२४ रोजी पहाटे ४ वाजता दत्तात्रय पारसे ऊस ट्रॅक्टर वर ड्रायव्हर म्हणून गेले होते. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितली. त्यानंतर दि. ८/३/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता घराशेजारी राहत असलेल्या वैशाली ढोबळे यांच्या मोबाईलवर दत्तात्रय पारसे यांनी फोन लावला. त्यावेळी त्यांना पत्नी, मुलगा व मुलगी हे दि. ६/३/२०२४ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून घरी नाहीत, असे समजले. त्यानंतर त्यांनी सासू शैला ढोबळे यांना फोन लावला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, दि. ६/३/२०२४ रोजी सकाळी १० वाजता त्या दवाखान्यात आल्या आहेत. त्यानंतर उंबरे दहिगाव येथे त्या गेल्या नाहीत. त्यामुळे सोनाली, अनुजा आणि श्रीराज यांच्या बद्दल त्यांना काहीही माहिती नाही. त्यानंतर दत्तात्रय पारसे यांनी पत्नी सोनाली यांचे मामा उमेश जाधव यांना फोन करून सोनाली विषयी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ती इकडे आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर दत्तात्रय पारस यांनी आजूबाजूला व माळशिरस परिसरात शोधले परंतु, त्या सापडल्या नाहीत. त्यांनी नातेवाईकांकडेही फोन करून चौकशी केली पण कुठेही त्या आले नसल्याची माहिती मिळाली.
पत्नी सोनाली, मुलगी अनुजा आणि मुलगा श्रीराज शोधाशोध करूनही न मिळाल्याने त्यांनी माळशिरस पोलीस स्टेशन येथे मिसिंग असल्याबाबतची तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम करत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.