खून करून गळफास बनाव करणाऱ्या आरोपीवर वडूज पोलिसांची कारवाई

वडूज पोलिसांनी गळफास बनाव करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
वडूज (बारामती झटका)
दि. १६/६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजणेचे सुमारास वडूज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कणसेवाडी गावचे हद्दीत डोंगराच्या जवळ कैलास बनसोडे यांच्या शेताच्या बांधावरील पिंपरणीच्या झाडाला विजय महादेव डोईफोडे वय ३४ वर्षे रा. कणसेवाडी याने गळफास घेतल्याबाबत त्याचा चुलत भाऊ गोविंद शंकर डोईफोडे याने वडूज पोलीस ठाणेस अकस्मात मयत नंबर २४/२०२४ सी.आर.पी.सी. कलम १७४ प्रमाणे तक्रार दिल्याने पोलीस अंमलदार यांनी त्याठिकाणी जावून प्रेताचा पंचनामा केला.

त्यावेळी मयत विजय डोईफोडे याचे डोक्याच्या डाव्या बाजूस आकाळावर व कपाळावर जखमेचा व्रण दिसला. तसेच छातीवर ओरखडलेले दिसले व मानेवर गळफासाचा गर्द व्रण तसेच मयताची हनुवटी पुढील बाजूस झुकलेली दिसल्याने तसा सविस्तर पंचनामा करून प्रेताचे ग्रामीण रुग्णालयात वडूज येथे पोस्टमार्टम केले. तसेच मयत घडले त्यादिवशी मयताचे चप्पल व मोबाईल सोबत नसल्याचे लक्षात आल्याने त्याचा शोध घेतला असता मयत घडले ठिकाणापासून १२ किलो मीटर अंतरावरती कातरखटाव ते एनकूळ माळ रानावरती मयताच्या चप्पला दिसल्या. तसेच त्याचा मोबाईल मिळून आला नसल्याने सदर मयतेबाबत पोलीसांना संशय असल्याने तपासीक अंमलदार पो. हथा. २२६३ खाडे व पो.कॉ. १३१६ शिरकुळे यांनी मोबाईलचे तांत्रिक माहितीवरुन तसेच कणसेवाडी डोंगर परिसरात फिरुन सदर मयताचे अनुषंगाने काही संशयित वस्तू मिळून येतात का, याची पाहणी करीत असताना दि. १८/०६/२०२४ रोजी मयत घडले ठिकाणापासून पश्चिमेस १ किमी अंतरावरती निर्जन ठिकाणी ट्रॅक्टरच्या टायरचे मार्क दिसल्याने त्याअनुषंगाने गोपणीय बातमीदार तसेच तो रस्ता येणारे वस्तीवरील लोकांच्याकडे विचारपूस करून यातील मयत विजय डोईफोडे हा मयत घडण्यापूर्वी अधिक बाबा जाधव याचेबरोबर वडूज येथे दिवसा होता. अशा प्राप्त माहितीवरुन बाबा जाधव याच्या घरासमोर गेले असता त्याठिकाणी निर्जन ठिकाणी मिळून आलेल्या ट्रॅक्टरच्या वाहनाच्या चाकाची नक्षी एकसारखी दिसल्याने संशय बळावला.
तसेच संशयीत अधिक जाधव हा घरी नसल्याने त्याचा कातरखटाव परिसरात शोध घेवून तो मिळून येताच त्यास विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारले असता संशयीत अधिक जाधव याने सांगितले की, यातील मयत विजय महादेव डोईफोडे हा दि. १५/०६/२०२४ रोजी माझेसोबत ज्वारी घेवून वडूज येथे आला होता. त्याठिकाणी मी त्याला दारु पाजून सायंकाळी ७.०० वाजणेचे सुमारास कातरखटाव येथे आलो. त्यावेळी माझ्या मनामध्ये विजय डोईफोडे याने गेल्या महिन्यामध्ये मी त्याचे घराकडे गेल्याचे कारणावरुन माझ्याशी बाचाबाची करुन माझी बदनामी केल्याचा राग माझ्या मनात असल्याने रात्री ८.०० वाजणेचे सुमारास विजय डोईफोडे यास पुन्हा दारु पाजून आपण एम.एस.ई.बी. सब स्टेशनचे पाठीमागे एनकुळे रोडला माळ रानावरती ट्रक्टरमधून गावाकडे जात असताना निर्जन ठिकाणी लघवी करण्यासाठीचे निमित्त काढून ट्रॅक्टर थांबवून विजय डोईफोडे हा बेसावध असताना त्याच्याच गळयातील शालीने गळा आवळून त्यास जिवे ठार मारुन त्यास ट्रॉलीमध्ये टाकून ट्रक्टर व ट्रॉली कणसेवाडी डोंगराचे कडेला आड रानात लावून विजय डोईफोडे यास मी खांदयावरती घेवून जावून पिपर्णीच्या झाडाला मारलेल्या शालीने लटकविले आहे. अशी कबूली यातील आरोपी अधिक जाधव रा. कणसेवाडी ता. खटाव, जि. सातारा याने दिली असल्याने त्याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
सदरची कारवाई समीर शेख, जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, सपोनि अमोल माने, पो. हवा. शिवाजी खाडे, पो. कॉ. गणेश शिरकुळे, पो. हवा. मल्हारी होंगे, पो.कॉ. सत्यवान खाडे, पो.कॉ. कुंडलिक कटरे, पी. कॉ. सागर बदडे, पो.कॉ. किरण चव्हाण पो. कॉ. पुष्कर जाधव, पो. कॉ. गजानन वाघमारे, पोहवा अमोल चव्हाण यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.