ताज्या बातम्या

खुशखबर…या तारखेपासून महिलांना वाढीव २१०० रुपये मिळणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा !

महिलांना वाढीव २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महिलांना दरमहा ₹२१०० देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या योजनेतील वाढीव रक्कम पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकानंतर लागू करण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

योजना सुरूच राहणार, परंतु वाढ पुढील वर्षीपासून…
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. उलट महिलांना मिळणारी रक्कम ₹१५०० वरून ₹२१०० करण्यात येईल. मात्र, ही वाढ येत्या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकानंतरच लागू होईल”.

पात्रता निकषांवर काटेकोरपणे अंमलबजावणी
या योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत फडणवीस यांनी माहिती दिली. “पात्रता निकषांचे पालन न करणाऱ्या काही महिलांना लाभ दिला गेला आहे, अशा तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकरणांची चौकशी करून अयोग्य लाभार्थींना योजनेतून वगळले जाईल,” असे ते म्हणाले.

त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे उदाहरण देत सांगितले की, “प्रारंभी या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांनाही मिळाला होता. नंतर पात्र शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी सुधारणा करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतही असेच केले जाईल, जेणेकरून योजना योग्य प्रकारे राबवली जाईल.”

महिला वर्गासाठी सरकारची हमी
महिला वर्गाला आश्वस्त करताना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले, “आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक नियोजन व संसाधनांची व्यवस्था करण्यात येत आहे. महिलांना योजना प्रभावीपणे मिळण्यासाठी योग्य पावले उचलली जातील.”

आगामी अंदाजपत्रकात महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत २.४३ कोटी महिला लाभार्थी आहेत. सरकार दरमहा या योजनेवर ३७०० कोटी रुपयांचा खर्च करते. महिलांना ₹२१०० देण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद आगामी अंदाजपत्रकात करण्यात येणार आहे. लाभार्थींच्या यादीचे पुनरावलोकन करून पात्र महिलांना लवकरच वाढीव रक्कम मिळेल.

महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा हातभार लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या या योजनेमुळे राज्यातील महिलांचा आत्मविश्वास वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button