कोळेगाव, फळवणी येथे चोरट्यांचा धुमाकूळ; चार तोळे दागिने लंपास

कोळेगांव (बारामती झटका)
अकलूज-सांगोला रस्त्यावर असलेल्या वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीत कोळेगांव व फळवणी येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री 12 ते सोमवारी पहाटे 5 वा.च्या सुमारास घरामध्ये घुसून व घराच्या बाहेर व्हरांड्यात झोपलेल्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, डोरले आदी प्रकारचे सोने कात्रीच्या सह्याने कट करून महिला झोपी गेल्याचे बघून चोरून नेल्याची घटना घडली असून याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कोळेगांव येथील सतिश पारसे यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. सतिश पारसे यांचे कोळेगांव येथे आई, वडील, पत्नी, भाचा असे सहकुटुंब राहणेस असून दि. 04/08/2024 रोजी नेहमीप्रमाणे रात्री 10.00 वा. जेवन करून सर्व सदस्य झोपले असता व्हरांड्यात झोपलेले वयोवृद्ध आई-वडील यांना झोपेमुळे काहीही समजायच्या आत अज्ञात चोरट्यांनी आईच्या गळ्यातील अंदाजे दीड तोळे किमतीचे गंठण व डोरले कात्रीच्या सहाय्याने कट करून चोरी करून नेले आहे.

तसेच फळवणी ता. माळशिरस येथील शिवराज प्रताप आवताडे यांची आई निर्मला आवताडे व नागनाथ चांगदेव आवताडे यांची पत्नी सुमित्रा आवताडे यांचे देखील सोन्याचे दागिने चोरून अंदाजे 3 ते 4 तोळे किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. एकाच रात्री कोळेगांव व फळवणी येथील चार ते पाच कुटुंबामध्ये चोरट्याने चोरीचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे दिसून येत असून फळवणी ग्रामपंचायतीच्या वतीने बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये चार चोरटे असल्याचे दिसून येत असून या फुटेजमुळे तपास करण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
सुस्त ग्रामसुरक्षा दल घालणार का गस्त ?
कोळेगांव येथे मागील सहा महिन्यापूर्वी गावातील युवकांची ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून वेळापूर पोलीस स्टेशन मार्फत टी-शर्ट, काठी, शिट्टी, बॅटरी असे साहित्यही दिले गेले असले तरी त्याचे वाटप अद्यापही करण्यात आले नसल्याने ग्रामसुरक्षा दलातील युवक हे गस्त घालीत नाहीत. युवकांनी गावात गस्त घातल्यास अशा चोरीच्या प्रकाराला आळा बसू शकतो, असे बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.