ताज्या बातम्याराजकारण

कोण रामदास आठवले ?

मुंबई (बारामती झटका)

कोण रामदास आठवले ?, असा प्रश्न जेव्हा दुधाचे दात ही न पडलेली मुले विचारतात तेव्हा खूप आश्चर्य वाटते.

आज आपण जे बोलतो, त्यासाठी जे मैदान इतर सहकारी यांच्या सहकार्याने तयार करून ठेवले ते रामदास आठवले….

अगळगाव, सांगली हे त्यांचे गाव. गावी अतिशय प्रतिकूल परिस्थती. पोट भरण्याचे वांदे तिथे शिक्षण कुठून घेणार ?पण, शिक्षणाच्या जिद्दीने मुंबईत आलेले रामदास आठवले. ज. वि. पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अविनाश महातेकर यांच्या पँथर प्रेमात अडकले आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करून पँथरच्या आंदोलनात सक्रिय झाले, ते रामदास आठवले….

पँथरचे आंदोलन एक सामाजिक चळवळ होती. जशी आजही खेड्यापाड्यात दलित वस्तीत सवर्ण आपला रुबाब दाखवतात, दलितांवर हल्ले करतात, दलित स्त्री वर बलात्कार करतात, तसे त्या काळातही होत होते. ते हल्ले थांबवण्यासाठी, दलितांचे आत्मभान जागृत करण्यासाठी 29 मे 1972 रोजी स्थापन झालेली पँथर. याच पँथरचे सक्रिय सदस्य होते रामदास आठवले….

पँथरने खेड्यापाड्यातील दलितांना न्याय मिळवून दिला. सामाजिक अन्याय ते वयक्तिक अन्याय यावर पँथर तुटून पडत होती. त्यात सहभागी होते ते रामदास आठवले….

सिद्धार्थ हॉस्टेलमधील आपल्या खोलीत अभ्यास करण्याऐवजी राजकीय बैठका रंगवत ते रामदास आठवले…

आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे आपले कुटुंब गरीब आहे, शिकलो तर सरकारी नोकरी लागेल आणि आईवडिलांचे कर्ज फेडता येईल, ही समज असूनही आई वडिलांपेक्षा समाजाचे आपण खूप मोठे देणे लागतो, म्हणून समाज घटकाचे ऋण फेडण्यासाठी समाजसेवेत उतरले ते रामदास आठवले…

पँथरच्या चळवळीत अगदी गुजरात पासून दिल्ली, पंजाब पर्यंत थडकलेले जे वादळ होते, त्या वादळाचा एक भाग होते रामदास आठवले….

पँथरच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले. अनेक गावांत जाऊन तेथील सवर्णांवर जरब बसवली गेली. दलितांना न्याय मिळवून दिला गेला. 7 मार्च 1977 ला पँथर वैयक्तिक कारणामुळे बरखास्त झाली. त्यानंतर लगेचच भारतीय दलित पँथर स्थापन केली गेली. त्या संघटनेचे संस्थापक सदस्य होते रामदास आठवले….

भारतीय दलित पँथर प्रा. अरुण कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करत होती. पँथरचेच काम अतिशय जोमाने करत होती. प्रा. अरुण कांबळे नंतर अध्यक्ष झाले ते होते रामदास आठवले….

1979 ला मराठवाडा विद्यापीठाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ नाव मिळावे म्हणून जो लॉंग मार्च काढला गेला त्यात अनेक संघटना होत्या पण, महत्वाची भूमिका आणि संख्या होती ती भारतीय दलित पँथरची. लॉंग मार्चमध्ये जहाल भाषणे केली ते होते रामदास आठवले….

‘रिडल्स इन हिंदुईझम’ या बाबासाहेबांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेने जो मोर्चा काढला, त्याला प्रत्युत्तर म्हणून आंबेडकरी जनतेने काढलेला रिडल्सचा लाखोंचा मोर्चा, त्या मोर्चाचे अनेक नेत्यांसोबत नेतृत्व करणारे एक नेते होते, ते रामदास आठवले….

पँथरने राबवलेल्या प्रत्येक आंदोलनाचे साक्षीदार होते रामदास आठवले. मग ते भूमीहिनांचे आंदोलन असो, बौद्धांच्या सवलती मिळवण्यासाठीचे आंदोलन असो, धर्मांतराची चळवळ असो, दलितांना आत्मभान मिळवून देण्यासाठीचे आंदोलन असो, नामांतराची लढाई असो, रिडल्सचा जागतिक विक्रम असो, गुजरातचे आरक्षण विरोधी आंदोलन असो की मंडळ आयोग आंदोलन असो या सगळ्यांचे साक्षीदारच नाही तर नेतृत्व करणारे आहेत रामदास आठवले….

जागतिक बौद्ध संघटनेत जेथे अनेक देश सहभागी आहेत त्या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत रामदास आठवले…‌.

जॉर्ज फर्नांडिस हे जहाल व्यक्तिमत्व जेंव्हा अंथरुणावर खिळले तेंव्हा आपला उत्तराधिकारी बनवून आपल्या रेल्वे संघटनेचे अध्यक्ष ज्यांना बहाल केले ते आहेत रामदास आठवले….

बामसेफ आणि बीएसपी सारख्या संघटना त्याच बरोबर आणखी काही संघटना या माई साहेब आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खुनी ठरवत होते, तेंव्हा माईसाहेबांची बाजू घेऊन त्यांना खंबीर पाठिंबा देणारे, माई साहेबांनी ज्यांना माणसपुत्र मानले, माईसाहेबांची शेवटपर्यंत पोटच्या मुलाप्रमाणे सेवा केली, ते आहेत रामदास आठवले….

समाजहितासाठी सतत पायाला भिंगरी बांधून संपूर्ण देशातच नाही तर विदेशात सुद्धा फिरत असतात. आपल्या समाजाला काही देता येईल का ?, हाच विचार सतत मनात असतो.
सकाळी दिल्ली तर संध्याकाळी मुंबई, आज सकाळी सोलापूर तर रात्री मराठवाडा, संपूर्ण देशभर संघटनेचे काम करत फिरत असतात. घरी कमी तर बाहेरच जास्त असतात. कुटुंबाचा वेळ समाजाला देणारे, कुटुंबाच्या शिव्या समाजासाठी खाणारे, रामदास आठवले….

दलित समाजातील मोठा घटक आपल्या कर्तृत्वाने आपल्या सोबत ठेवणारे आणि त्यांच्यासाठी आंदोलने उभारणारे रामदास आठवले….

विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपासून तर अधिकाऱ्यांच्या पदोन्नती पर्यंत सर्व क्षेत्रात लढा देणारे, रामदास आठवले….

नेत्यांनी पांढरेच कडक कपडे घातले पाहिजेत, या गोष्टीला फाटा देऊन रंगीत चट्ट्या पट्ट्याचे ड्रेस घालून नवीन पायंडा पाडून तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले, आपली नवी ओळख निर्माण केली, ते रामदास आठवले….

6 डिसेंम्बर रोजी ज्यांची सभा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून हजारोंच्या संख्येने गर्दी करणारे, शिवाजी मैदान भरून टाकणारे नेते म्हणजे रामदास आठवले….

महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात आणि विदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नेते म्हणजे रामदास आठवले….

कुटुंबातुन कुठलाही राजकीय वारसा नसलेले, स्वकर्तृत्वावर इतक्या मोठया पदावर पोचलेले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बौद्ध समाजाचे भारत सरकारमध्ये मंत्री होणारे रामदास आठवले….

अनेक वर्ष संघर्ष करून संघर्ष नायक झालेले, गळ्यात झोळी, पायात स्लीपर, केस वाढलेले, दाढी वाढलेली, वेळेवर जेवण मिळत नव्हते. जेवण्यासाठी सुद्धा ज्यांच्याकडे आणि ज्यांच्या कार्यकर्त्याकडे पैसे नसत. वडापाव किंवा बुर्जी पाव खाऊन दिवस ढकलणारे, पण निराश होऊन समाजकार्य न सोडणारे, ते रामदास आठवले….

महाराष्ट्राचे मोठे नेते शरद पवार यांनी त्यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून आणि ज्यांच्या मागे मोठा समाज आहे हे हेरून त्यांना आपल्याकडे आकृष्ठ करून त्यांना 1990 मध्ये अवघ्या 31 व्या वर्षी महाराष्ट्र सरकारमध्ये केबिनेट मंत्री बनवून समाजकल्याण खात्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी त्याचे सोने केले. दलितांवरील अन्याय दूर करण्याचे प्रयत्न केले, अदिवासी कल्याण केले, वसतिगृहात सुधारणा केल्या, गायरान जमिनी मिळवून दिल्या, बेरोजगारांना मिळणाऱ्या कर्जात शिथिलता आणली. आणखी बरीच कामे केली, ते नामदार रामदास आठवले.‌…

आपल्या समाजाची ताकद कमी आहे. आपला राजकीय टक्का कमी आहे. आपण स्वबळावर कुठेच सत्तेत येऊ शकत नाहीत. साध्या ग्रामपंचायत मिळवू शकत नाहीत. हे हेरून कोणाशी तरी युती करणे आवश्यक आहे. हे समजून काँग्रेस या मोठ्या पक्षाशी युती करून मुंबईचे महापौर पक्षाला मिळवून देणारे, आपल्या सोबत असणाऱ्या प्रामाणिक आणि योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळवून देणारे, आमदारकी मिळवून देणारे नेते, रामदास आठवले….

त्यांच्या सोबत राहून मोठी मोठी पदे भोगून स्वार्थ साधल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होऊन नवीन रिपब्लिकन गट साधणारे आणि रिपब्लिकन गटात वाढ करणाऱ्या अनेक नेत्यांशी आजही सामंजस्याने वागणारे, कोणाबद्दल मनात कटुता न ठेवणारे नेते, रामदास आठवले….

पहिल्यांदा मंत्री झाले तेंव्हा कार्यकर्त्यानी त्यांना कपडे दिले असे सामान्यातील सामान्य नेतृत्व रामदास आठवले….

काँग्रेस बरोबर युती करून रिपब्लिकन चार खासदार निवडून आणून इतिहास घडवणारे नेते रामदास आठवले….

आपल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात वेळात वेळ काढून सहभागी होणारे, हमखास त्यांच्या घरी जाऊन भेट देणारे नेते, आवश्यक असल्यास कार्यकर्त्यास मदत करणारे, दलित नेत्यांपैकीच नाही तर सर्व नेत्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रवास केलेले, कार्यकर्त्याशी नाळ जोडलेले, सामान्य कार्यकर्त्यांशी सुद्धा अदबीने वागणारे, आयुष्यातील महत्वाचे क्षण कार्यकर्त्यांना देणारे नेते, रामदास आठवले….

12 व्या लोकसभेत (1998) उत्तर मध्य मुंबईतून पांढरी दाढीवाले आठवले विरुद्ध काळी दाढीवाले आठवले या लढतीत काळी दाढी वाले आठवले यांनी बाजी मारली आणि खासदार झाले.
13 व्या लोकसभेत (1999) पंढरपूर मतदार संघातून सात वेळा निवडून आलेल्या संदीपान थोरात यांना पराभूत करून निवडून आलेले खासदार. 14 वि लोकसभा (2004) परत निवडून आले आणि वाहतूक पर्यटन आणि संस्कृती या समितीत सदस्य झाले. 1999 सदस्य कॉन्सलटीव्ह कमिटी, युनायटेड मिनिस्ट्री ऑफ युथ, अफैर्स अँड स्पोर्ट्स,
2007 सदस्य स्थायी समिती, लेबर 2008 सदस्य, फाईनन्सिल कमिटी ऑफ इसटीमेट्स 2014 राज्यसभा सदस्य, 2016 केंद्रीय मंत्री (भारत सरकार) समाजकल्याण झाले ते रामदास आठवले….

1998-99 मध्ये काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहिले.
2009 च्या शिर्डी मतदार संघात पराभूत झाले. सुरक्षित मतदार संघात त्यांचा पराभव मुद्दाम केला गेला याची खात्री असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि वेगवेगळे पक्ष घेऊन ‘रिडोलास’ स्थापन केली. ही सेना बीजेपी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधात होती. पण तिला यश आले नाही. मग सेनेबरोबर गेले. मुंबई महापालिका लढवली पण यश आले नाही. सेनेने झुलत ठेवले.त्यांच्या ताकदीचा अपमान केला. सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि मित्र अनिल देसाई यांना राज्यसभेवर पाठवले गेले. सगळी मीडिया म्हणत होती, रामदास आठवले यांना शिवसेना राज्यसभेवर पाठवेल पण तसे झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सेनेची साथ सोडून बीजेपी सोबत गेले. संपूर्ण भारतात बीजेपीचे 282 सदस्य निवडून आले. महाराष्ट्रामधून युतीचे 42 सदस्य निवडून आले. यात रामदास आठवले यांची ताकद होती. हे ओळखून ज्यांना बीजेपीने राज्यसभेवर घेऊन 2016 मध्ये मंत्री बनवले, ते रामदास आठवले….

हौसाबाई व बंडू आठवले यांच्या पोटी गरीब कुटुंबात 25 डिसेंम्बर 1959 रोजी जन्मलेले समाजासाठी शिक्षण अर्धवट सोडलेले, कुठलाही राजकीय वारसा नसताना पुढे पुढे जाणारे, मोठी महत्वाकांक्षा असलेले, विशेष म्हणजे दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजेच रामदास आठवले….

मला वाटते, इतकी माहिती पुरेशी आहे. ‘कोण रामदास आठवले ?’, म्हणून विचारणाऱ्यांसाठी कडू डोस‌.

एखाद्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय त्याच्या विषयी मत व्यक्त करणे चुकीचेच आहे किंवा सगळे काही माहीत असूनही त्याची अवहेलना करणे चुकीचे आहे.
आपण त्यांच्या जवळपासही पोहचू शकत नाही, अश्यांनी उगीच जीभ टाळ्याला लावण्याचा प्रयत्न करू नये.

लेखक –
शांताराम निकम उल्हासनगर

तुषार तानाजी कांबळे
सचिव – महाराष्ट्र प्रदेश (आरपीआय) आठवले
श्रमिक ब्रिगेड
मो. 9763655111

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button