कोंडबावी येथील लतिका व दत्तू यादव यांना राज्यस्तरीय आदर्श माता-पिता पुरस्कार

अकलूज (बारामती झटका)
स्वतःच्या तुटपुंज्या शेतीत काबाडकष्ट करून तसेच प्रसंगी शेतमजूर म्हणून दुसऱ्याच्या रानात काम करून स्वतः अल्पशिक्षित असूनही आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षित करणाऱ्या कोंडबावी (ता. माळशिरस) येथील दांपत्याने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
कोंडबावी येथील दत्तू खेमा यादव व सौ. लतिका दत्तू यादव या दाम्पत्याने शिक्षणाचे महत्त्व समजून आपल्या तिन्ही मुलांना पदवी व पदवीत्तर पदवीचे शिक्षण देवून उच्चपदस्थ बनविले. घरची हलाखीची परिस्थिती, तुटपुंज्या शेतीवर उदरनिर्वाह चालू असताना सुमारे ४७ वर्षांपूर्वी दत्तू यादव व लतिका यादव यांचा विवाह झाला. एकत्र कुटुंब असल्याने घरात व्यक्तींची संख्या जास्त पण, उत्पन्न कमी अशा परिस्थिती संसाराचा गाडा हाकत असताना कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहण्याची वेळ यायची. परंतु कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संसार चालूच होता. अशातच प्रथम दोन मुले व नंतर तिसऱ्या वेळी तरी मुलगी होईल ही अपेक्षाही पूर्ण न होता मुलगाच झाला. दत्तू यादव व लतिका यादव या दोघांनाही आपले शिक्षण कमी असल्याने होणाऱ्या त्रासाची जाणीव होती, हाच त्रास आपल्या मुलांना होऊ नये, यासाठी तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करायचे हे स्वप्न उराशी बाळगून अहोरात्र कष्ट सुरू केले. स्वतःच्या अडीच एकर शेतीतून मिळणारे उत्पन्न व तिनही मुलांच्या शाळेचा खर्च याचा मेळ बसतच नव्हता. त्यामुळे वेळोवेळी दुसऱ्याच्या रानात जाऊन पेरणी, खुरपणी, कोळवणी अशी विविध कामे, मोलमजूरी करून त्यातून मुलांचा शैक्षणिक शुल्क भागवण्याचा निर्णय या दांपत्याने घेतला.
कोंडबावी येथे फक्त सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण होते. तर पुढील शिक्षणासाठी चार किलोमीटर चालत जाऊन शिकावे लागत होते. त्यांचा थोरला मुलगाने प्राथमिक शिक्षण चालत जाऊन तर माध्यमिक शिक्षण सायकलवर जाऊन पूर्ण केले. मोठ्या जिद्दीने व चिकाटीने ते शिक्षण सायकलच्या दुकानात स्वतः काम करून पूर्ण केले. उच्च महाविद्यालयीन शिक्षण एम.ए.बी.एड्. करून आज तो एका संस्थेमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. दुसऱ्या मुलाने बी.ए., जी.डी.सी. अॅन्ड. ए. करून आज तो ‘सकाळ मिडिया प्रा. लि.’ या न्यूज पेपरमध्ये जाहिरात डिझाईनर म्हणून कार्यरत आहे. तर तिसरा मुलगा बी.ए. व डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरींग करून पुण्यामध्ये एक छोटीशी कंन्स्ट्रक्शन फर्म चालवित आहे.
अशा आपल्या जिद्द, अपार कष्ट व हिंमतीच्या जोरावर तिन्ही मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या या दाम्पत्याच्या कार्याची दखल घेत पुणे येथील सुसंगत फौंडेशनच्या वतीने त्यांचा आदर्श माता-पिता पुरस्कार देऊन गौरव करणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.