लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा…

दोन लाख महिलांना मिळणार फायदा
मुंबई (बारामती झटका)
लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राहील, त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेविरोधात ‘सावत्र भावांनी’ काही जणांना न्यायालयात पाठविले आहे, पण न्यायालयही योजनेस न्याय देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सिल्लोड येथे लाडकी बहीण योजनेत दोन लाख अर्ज मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी मोठ्या प्रमाणात लाभार्थी उपस्थित होते.
सरकार महिलांना आर्थिक, सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच विरोधकांकडून खोटा प्रचार सुरू करण्यात आला आहे. ही योजना केवळ निवडणुकीपुरती नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक महिलेस वार्षिक १८ हजार रुपये मिळतील, त्यामुळे केवळ रक्षाबंधनापुरती ही योजना नाही. याशिवाय तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जातील आणि मुलींना उच्च शिक्षणही मोफत देण्याची योजना हाती घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संपूर्ण मुंबईतून आतापर्यंत सुमारे सहा लाख अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून, छाननीकरिता प्रत्येक विभागामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. प्रतितास ४० अर्जांची छाननी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिले आहेत.

अर्जांची छाननी वेगाने पूर्ण करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयात दहा संगणक उपलब्ध करून स्वतंत्र कक्ष स्थापन करावे, प्रत्येक संगणकावर सकाळी सात ते दुपारी तीन आणि दुपारी तीन ते रात्री अकरा अशा दोन पाळ्यांत काम करावे, प्रत्येक पाळीमध्ये सखोल माहिती असलेल्या पर्यवेक्षकांची नेमणूक करावी असेही निर्देश दिले आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.