लक्षवेधी बातमी : माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर, घडामोडींच्या हालचाली वाढल्या…

लोकसभेच्या निवडणुकीला मदत करा, विधानसभेच्या निवडणुकीत सहकार्य करू, मोहिते पाटलांचा मोहिते पाटील विरोधकांना प्रस्ताव….
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या व राज्याच्या राजकारणात नाट्यमयरित्या घडामोडी घडत असताना माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येणार असल्याच्या राजकीय घडामोडी घडण्याच्या हालचाली वाढलेल्या आहेत. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक असे आजपर्यंतचे राजकारण झालेले आहे. मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी डावलल्यानंतर मोहिते पाटील वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले आहेत. माढा लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, असा इरादा केलेला असल्याने धैर्यशील मोहिते पाटील लोकसभेसाठी उभे राहणार आहेत.
माळशिरस तालुक्यातील पारंपरिक विरोधक असणाऱ्यांना विधानसभेला तुम्हाला मदत करू, लोकसभेला आम्हाला मदत करा, असा प्रस्ताव मोहिते पाटील यांचेकडून विरोधी गटांना आलेला आहे. त्याप्रमाणे विरोधकांच्या हालचाली वाढलेल्या आहेत. भविष्यात माळशिरस तालुक्यातील राजकारण कोणत्या वळणावर जाईल याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. सुरुवातीस मोहिते पाटील यांचेकडून हात पुढे आलेला असल्याने विरोधक हातात हात घेतात की, हाताला झिडकारून देतात, यावरही भविष्यातील राजकीय नांदी ठरणार आहे. अद्यापपर्यंत बैठका सुरू आहेत. घडामोडी घडण्यासाठी हालचालीला वेग आलेला आहे. लवकरच याचे चित्र स्पष्ट होईल, त्यावेळेस माळशिरस तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. सध्या तरी चर्चा आहे चर्चेचे रूपांतर होते किंवा नाही याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.