लेकीपेक्षा सुनेने पवार घराण्याचे नाव देशासह जगात राजकीय पटलावर कोरले…

देशाचे सर्वोच्च सभागृह राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष पदी सौ. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नियुक्तीने पवार घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा…
काटेवाडी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुसंस्कृत व सौजन्यशील धर्मपत्नी राज्यसभेच्या खासदार सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्या देशाच्या सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्तीने पवार घराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. लेकीपेक्षा सुनेने पवार घराण्याचे नाव देशासह जगाच्या राजकीय पटलावर कोरलेले आहे, याचा अभिमान माहेर व सासरच्या लोकांना आहे.
खासदार सुनेत्रावहिनी यांचा काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानापासून सुरु झालेला सामाजिक कामाचा प्रवास आता राज्यसभा तालिका अध्यक्ष, असा प्रवास खूप अभिमानस्पद आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वारसा असलेले माहेर आणि त्याच तोलामोलाचे सासर त्यांना मिळाले. वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांचा सक्रिय सहभाग आणि नंतरच्या काळात तेर परिसरातील अनेक गावाचं त्यांनी स्वीकारलेले अनभिषिक्त पालकत्व, हा सगळा समृद्ध वारसा त्यांनी पुढे चालवावा, असे त्यांचे भाऊ अमरकाका यांना वाटतं.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनेत्रावहिनींनी काटेवाडीत ग्रामस्वच्छता चळवळ सुरु केली. ग्रामस्वच्छता अभियानामध्ये त्यांच्या प्रेरणेने काटेवाडीतील प्रत्येक घरातील माणूस सहभागी झाला. आणि राज्यात, देशात अगदी आशियायी राष्ट्रातही त्यांचा गवगवा झाला, कौतुक झाले.
एका समृद्ध घरातील माहेरवासिनीचा सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. त्यांनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बारामतीला अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम झाले, त्यात त्यांचा अग्रस्थानी पुढाकार राहिला. अनेक कार्यक्रमाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली.
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. त्याअगोदर पवार कुटूंबातील निवडणूक लढवणाऱ्या सर्व सदस्यांच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्या अग्रेसर राहत होत्या. प्रत्येकाच्या विक्रमी विजयात त्यांचा सहभाग होताच. त्यांचा स्वतःचा राजकीय प्रवेश लोकसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीत दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. निवडणुकीत लेक सुनेची टीका टिपणी झाली, मान, अपमान, सहन केला. पण, पराभवानंतर खचून न जाता त्या जनसेवेत राहिल्या. नंतर काही दिवसांनी त्यांना राज्यसभा या उच्च सभागृहात जाण्याची संधी मिळाली. त्या राज्यसभा खासदार झाल्या. त्यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कामाची कुठंतरी नोंद घेतली याचा आनंद वाटला. काटेवाडीच्या प्रत्येक माणसाला आपणच खासदार झालो असं वाटू लागलं.
स्वच्छ आणि सुंदर काटेवाडी व्हावी म्हणून पहाटे पाच वाजता हातात खराटा घेऊन सर्वात पूढे असलेल्या सुनेत्रावहिनींना यांचे कष्ट आठवू लागले. त्यांना मिळालेल्या संधीमुळे भगवान के घर में देर है, लेकीन अंधेर नही, याचा प्रत्यय आला.
त्यांची राज्यसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची बातमी आली आणि काटेवाडीकरांसह संपूर्ण बारामतीकरांचे मन भरून आले. भारतातील सर्वोच्च सभागृहाच्या तालिका अध्यक्ष पदाच्या आसनावर त्यांनी विराजमान होणे, त्यांना त्या जागेवर बघणे, हा तेरच्या माहेरवासिनीचा आणि काटेवाडीच्या सुनेचा सन्मान आहे. एका समृद्ध सासर आणि माहेरचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या लेकीसुनेला अशा आसनावर आरुढ होण्याचा मान मिळणे, ही गौरवाची गोष्ट आहे.
आम्हालाही सुनेत्रावहिनी यांचा सार्थ अभिमान वाटतो. भावी कारकिर्दीस बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.