पिकांना खते दिल्यानंतर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाकडून खते बोगस असल्याचे जाहीर

तब्बल २५ कंपन्यांचे खत ठरवले बोगस
छत्रपती संभाजीनगर (बारामती झटका)
मराठवाड्यात खरिपाच्या पेरण्या झाल्या…, पिकांना खते देण्यात आली…, त्यानंतर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण विभागाने बाजारपेठेत विविध कंपन्यांकडून विक्री करण्यात आलेल्यांपैकी तब्बल २५ कंपन्यांचे खत बोगस असल्याचे नमुना तपासणीत जाहीर केले. कृषी विभागाच्या ‘वरातीमागून घोडे’ मुळे पेरणी करून त्यांना खताची मात्रा देणारा शेतकरी मात्र नागावला आहे.
अकोला येथील तत्कालीन कृषिमंत्र्यांच्या धाडीनंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या माथी बोगस अप्रमाणित खते मारण्यात आली. खरीप हंगामातील खत पुरवठ्यानंतर कृषीच्या गुण नियंत्रण विभागाने बाजारपेठेत आलेल्या अनेक कंपन्यांचे नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या खत नमुन्यांचा नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे. यापैकी तब्बल २५ कंपन्यांच्या खतांचे नमुने अपात्र असल्याचे तपासणी अहवालात समोर आले आहे. यामध्ये आरसी फर्टीलायझर, इफको, कोरोमंडल, निर्माण फर्टीलायझर, केपीआर, झुआरी ॲग्रो केम यासारख्या नामवंत कंपन्यांचे सिंगल सुपर फॉस्फेट खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्य खते, विद्रव्य व मिश्र खतांचे ३६ नमुने अपात्र झाले आहेत. यामध्ये इफको, झुआरी ॲग्रो केम, आरसी फर्टीलायझर, केपीआर क्रॉप सायन्स, कोरोमंडल १, ग्रीनफिल्ड ॲग्रीकेम, ढेकळे सेंद्रिय, यारा खत, महाराष्ट्र बायो फोर्ट, धर्मराज पीक रक्षक, आर एम फॉस्फेट आणि केम, अमप्रा बायो बॅक्ट, सल्फर मिल्स, प्रिव्ह लाईफ सिन्स, निर्माण फर्टीलायझर, आरती फर्टीलायझर, पूर्वा केमटेक, श्रीपुष्कार केमिकल्स, रामा कृषी रसायन, आरपीव्ही ॲग्रो टेक, वनिता ॲग्रो केम, स्मार्ट केम टेक्नॉलॉजी, ॲपेक्स ॲग्रो, महाफिल्ड स्पेशालिटी फर्टीलायझर आदी कंपन्यांची खते अप्रमाणित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी खत म्हणून केली मातीची खरेदी
गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे मोडकळीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामांकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, खरिपात उशिरा पाऊस पडला त्यातही आता पिके करपू लागली. या पिकांच्या वाढ आणि उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेले खतांचे नमुने अप्रमाणित आढळून आले. शेतकऱ्यांनी खत म्हणून केलेली खरेदी ही माती निघाली म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
नमुने परराज्यात तपासणीसाठी जाणार…
जिल्ह्यातील कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत अप्रमाणित ठरलेल्या नमुन्यांची सुनावणी घेऊन हे नमुने परराज्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतर संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng