माढा तालुका “माझी लाडकी बहीण” समितीच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह शिंदे यांची नियुक्ती
माढा (बारामती झटका)
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेची ग्रामीण भागातील प्रत्येक गावात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून माढा तालुक्यासाठी गठित केलेल्या अकरा सदस्यिय समितीच्या अध्यक्ष पदावर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजीतसिंह (भैय्या) बबनराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे.
समितीचे माढा तालुक्यातील इतर सदस्य याप्रमाणे –
माढा तालुक्यातील नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती कुर्डूवाडी, ता. माढा, सहाय्यक आयुक्त/सहाय्यक अधिकारी समाज कल्याण विभाग माढा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प माढा, माढा तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, माढा तालुका अंगणवाडी प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षिका श्रीमती लता पाटील तसेच अशासकीय सदस्य म्हणून पडसाळी, ता. माढा, येथील योगेश पाटील व माढा, ता. माढा, येथील प्रियदर्शन साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे सचिव म्हणून माढ्याचे तहसीलदार असणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने या तालुकास्तरीय समितीची दरमहा बैठक होणार असून योजनेची देखरेख व नियंत्रण करणे, दररोजचा आढावा घेणे, पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, तसेच ग्रामीण स्तरावर पात्र झालेल्या अर्जांची छाननी करणे, तपासणी करणे व सोबत जोडलेल्या कागदपत्राची पडताळणी करणे, तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्गमित सूचनांचे व आदेशांचे पालन करणे, इत्यादी जबाबदार्या पार पाडावयच्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.