माढेश्वरी बँकेच्या कर्जदाराची बँक अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी

बँकेच्या करकंब शाखेत गुरुवारी घडला प्रकार; कर्जदार विठ्ठल जाधव याचे निंदनीय कृत्य
करकंब (बारामती झटका)
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील माढेश्वरी अर्बन बँकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी केल्याची घटना गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची रितसर तक्रार बँकेचे अधिकारी बाळासाहेब तानाजी पवार, रा. सापटणे, ता. माढा यांनी करकंब पोलिसांत दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माढा येथील माढेश्वरी अर्बन बँकेची करकंब येथे शाखा आहे. या शाखेतून विठ्ठल हरिदास जाधव यांना सन 2019 मध्ये कर्ज दिलेले आहे. गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता विठ्ठल जाधव यांनी माढेश्वरी बँकेत येऊन तुम्ही माझ्या व जमीनदाराच्या घरी कर्ज मागणीसाठी का जाता म्हणून बँकेचे शाखाधिकारी बाळासाहेब पवार यांना शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी करून तुला व बँक कर्मचारी प्रदीप शिंगटे याला बघून घेतो, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बँकेतून कर्ज घ्यायचे आणि मागायला गेल्यानंतर दहशत निर्माण करून वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्याची अनिष्ट प्रवृत्ती निर्माण झाल्यास भविष्यात एकही आर्थिक संस्था सुस्थितीत राहणार नाही. ज्या लोकांनी बँकेत डिपॉझिट केले आहे, त्यांना सुद्धा धोका निर्माण होईल. जामीनदाराने सहाय्यक कर्जदार म्हणून कर्जदाराच्या अर्जावर सह्या केलेल्या असतात. त्यामुळे बँकेचे कर्ज वेळेवर परतफेड करायला लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. घेतलेले कर्ज वेळेवर न भरण्याची अपप्रवृत्ती असणाऱ्या व बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ केलेल्या संबंधित कर्जदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी केली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



