महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड

अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष माणिक मिसाळ यांनीच डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची सूचना केल्यानंतर त्यास सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले. डाॅ. धवलसिंह यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
माळशिरस तालुक्यात जनसेवा संघटनेची स्थापना सहकार महर्षी स्व. शंकरराव मोहिते पाटील यांनी १९७५ साली केल्यानंतर १९९८ मध्ये लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी या संघटनेचे महाराष्ट्र जनसेवा संघटना असे नाम विस्तारीकरण करून जनसेवा संघटनेचे जाळे जवळपास राज्यातील २६ तालुक्यात पसरवले आहे.
डॉ. धवलसिंह यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या महिन्यात पुन्हा संघटनेचे मुख्यालय असणाऱ्या प्रतापगड येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्याचा कारखाना असणाऱ्या या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा बळ देण्याचे सूतोवाच केले. तेव्हापासून या संघटनेत आलेली मरगळ जाऊन कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. याच दरम्यान संघटनेच्या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या फेरनिवडी झाल्या. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण स्तरावर पदाधिकाऱ्यांची बांधणी केली आहे. त्यानंतर रविवारी संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांची प्रतापगड येथे बैठक होऊन संघटनेच्या कामाला आणखी वेग येण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी डॉ. धवलसिंह यांनीच संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी, अशी मागणी वाढू लागली. या पार्श्वभूमीवर मावळते अध्यक्ष माणिक मिसाळ यांनी स्वतःच नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला असता उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यास अनुमोदन दिले.

जनसेवाच्या कार्यकर्त्यांना सर्वतोपरी बळ देणार.
आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे म्हणून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी या संघटनेची स्थापना केली असली तरी स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी या संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवून संघटनेचा विस्तार केला. त्यांनी कार्यकर्त्यांना राजकीय बळ दिल्याने अनेक कार्यकर्ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य या पदावर गेले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण ही कार्यकर्त्यांना राजकीय बळ देणार आहे. – डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, प्रतापगड, शंकरनगर, अकलूज
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.