माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार केल्याने कायदेशीर कारवाई करावी…

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य दिव्यांग भव्य क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी यांची मागणी…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व यशवंतनगर व दहिगाव गावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार केल्याने कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजयकाका वसंत कुलकर्णी यांनी लाच लचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे. सदरच्या प्रति जिल्हा परिषद सोलापूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अँटी करप्शन ब्युरो सोलापूर, उपविभागीय कार्यालय अकलूज, पंचायत समिती माळशिरस, पोलीस स्टेशन अकलूज येथे देण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विजयकाका कुलकर्णी यांनी दिलेल्या निवेदनात माळशिरस तालुक्यात दिव्यांगांच्या पाच टक्के निधीचा मोठा भ्रष्टाचार होत असल्यामुळे माळशिरस तालुक्यातील आम्ही दिव्यांग बांधवांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्या कार्यालयासमोर मागील महिन्यात बोंबाबोंब आंदोलन केलेले होते. या आंदोलनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी आम्हाला दि. 19/8/2024 रोजी ग्रामपंचायत यशवंत नगर व ग्रामपंचायत दहिगाव यांची दिव्यांग पाच टक्के निधीची माहिती मागून आम्हाला पत्र दिले. परंतु, त्या पत्रात असे आढळून आले की यशवंतनगर ग्रामपंचायतीकडून रफिक चाॅंद पटेल यांना दिव्यांग पाच टक्के निधी दि. 05/04/2023 रोजी रक्कम रुपये 11000 दिले व पुन्हा त्यांनाच दि. 08/12/2023 रोजी रक्कम रुपये 12000 दिले. असे एकाच दिव्यांग बांधवाची वर्षातून दोन वेळा निधी पाठवलेला दाखवून दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे.

तसेच दहिगाव ग्रामपंचायतीमधून दिव्यांग 5% निधीतून पाच व्हील चेअर खरेदी केल्या. एका व्हीलचेअरची किंमत 7500/- दाखवण्यात आली व एकूण पाच व्हिल चेअर ची किंमत 37,500/- रुपये दाखवण्यात आले. परंतु सदर एक व्हीलचेअर 7,500/- रुपये किमतीची नसून या व्हीलचेअर ची किंमत 4,725/- रुपये इतकी आहे. त्याची आम्ही दि. 30/08/2024 रोजी ओम रेमेडाईज, अकलूज यांचे कोटेशन घेतलेले आहे. तसेच दि. 30/08/2024 रोजी एस. पी. एस. मानवता फार्मा यांच्याकडून एक व्हीलचेअर 5000/- रुपयास विकत घेतली आहे. यामुळे आम्हाला आज रोजी समजले की, दहिगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी व्हील चेअर खरेदीमध्ये 12,500 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच यशवंतनगर ग्रामपंचायत यांनी एका व्यक्तीचे दोन वेळा लाभ दाखवून रुपये 11,000 चा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून आपणांमार्फत याबाबतीत सखोल चौकशी करून चौकशीअंती दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी. केलेल्या कारवाई प्रसंगी संघटनेस लेखी अवगत करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करून सदरच्या निवेदनासोबत व्हीलचेअर खरेदी व कोटेशन छायांकित प्रत जोडलेली असून गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांच्याकडून मिळालेल्या माहितीसोबत जोडलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.