महावितरणचा आणखी एक लाचखोर सापडला रंगेहाथ
फुकटच्या पैशांचा मोह नडला
पंढरपूर (बारामती झटका)
अलीकडे लाचखोरीत महावितरणचे नाव पुढे येताना दिसत असतानाच दोन हजाराच्या लाचेसाठी पंढरपूर येथील एक कनिष्ठ अभियंता पकडला गेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी, पंढरपूर ग्रामीण येथे कार्यरत असलेला कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर याला २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. साईनाथ नामदेव सरगर (वय ४०), शिवपार्वती नगर, कराड नाका जवळ, पंढरपूर याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
यातील तक्रारदार हे विद्युत ठेकेदार असून एका कंपनीकडून त्यांना पंढरपूर तालुक्यातील मेमतवाडी येथे एअरटेल मोबाईल कंपनीच्या टॉवरवर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम मिळाले आहे. सदर ट्रान्सफॉर्मरच्या विद्युत कनेक्शन करिता महावितरणची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी महावितरण पंढरपूर ग्रामीण २ येथे अर्ज केला आहे. सदर अर्जावरून इस्टीमेट तयार करून पुढील कार्यवाहीकरिता उपअभियंता यांच्याकडे सादर करण्याकरिता कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर यांनी २ हजार रुपयांची लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साईनाथ सनगर याला रंगेहाथ पकडले असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक गणेश कुंभार यांनी पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार अतूल घाडगे, सलीम मुल्ला यांच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई केली. यामुळे महावितरणमध्ये खळबळ उडाली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.