ताज्या बातम्या

माळी समाज ठरविणार आपली राजकीय दिशा…

२३ जून रोजी भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषद

भुसावळ (बारामती झटका)

महाराष्ट्रात माळी समाजाची मतदार संख्या ही काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची तर काही ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची आहे. परंतु, त्या तुलनेत महाराष्ट्रात राजकीय प्रतिनिधित्व माळी समाजाला लाभलेले नाही. प्रत्येक ठिकाणी माळी समाजाची उपेक्षा केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष माळी समाजाला गृहीत धरूनच आपली वाटचाल करीत आहे. त्यामुळे वर्षागणिक माळी समाजाचा राजकीय टक्का हा खाली घसरत चाललेला आहे. यासाठी माळी महासंघाने पुढाकार घेत माळी समाज हक्क परिषद घेणार असल्याची माहिती माळी महासंघाचे किसान आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री. शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे.

सन १९७८ मध्ये जेवढे आमदार माळी समाजाचे होते, त्या तुलनेस २०२४ मध्ये एक तृतीयांश एवढी कमी संख्या माळी समाजाच्या आमदारांची झालेली आहे. महाराष्ट्रात ज्या समाजाची संख्या १८ टक्के आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत ३५ जागा व माळी समाजाची संख्या १० टक्के असुन देखील फक्त १ जागा, अशीच काहीशी स्थिती स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये लोकप्रतिनिधित्वाच्या बाबतीत माळी समाजाची आहे.

या पार्श्वभूमीवर माळी समाजातील इच्छुकांना विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी आणि माळी समाजाच्या उमेदवारांचा विजय होत राजकीय टक्का वाढावा, यावर चिंतनासाठी रविवार दि. २३ जून २०२४ रोजी माळी भवन, नाहाटा कॉलेज जवळ, भुसावळ येथे “माळी समाज हक्क परिषद” आयोजित करण्यात आली आहे. या हक्क परिषदेच्या समन्वयकाची जबाबदारी “माळी महासंघाने” उचलली असून या परिषदेला महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणारे उमेदवार, लोकप्रतिनिधी व माळी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.

या परिषदेत माळी समाज : एक उपेक्षित समाज, माळी समाज : एक दुर्लक्षित समाज, माळी समाज : एक राजकीय दृष्ट्या अस्तित्व नसलेला समाज या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील माळी समाजाला या हक्क परिषदेतून एक वेगळी दिशा मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण सुरक्षित रहावे व मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे, याविषयी जो संघर्ष सुरू आहे, याबाबत माळी समाजाची नेमकी भूमिका काय असेल याचेही मंथन या हक्क परिषदेत केले जाणार आहे.

या परिषदेमध्ये माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी ठाकरे, प्रदेश अध्यक्ष अरूणजी तिखे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचे मुख्य संयोजक कैलासजी महाजन हे राहणारअसून गजेंद्रजी महाजन हे व्यवस्था प्रमुख असतील. या परिषदेच्या माध्यमातून माळी समाज आपली राजकीय दिशा निश्चित ठरविणार असल्याने या हक्क परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

तरी या परीषदेला माळी समाजातील प्रतिनिधींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माळी महासंघ तर्फे करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

7 Comments

Leave a Reply

Back to top button