मल्लसम्राट रावसाहेब मगर : निमगावची अस्मिता

निमगाव (म.) बारामती झटका
कुस्तीच्या क्षेत्रात स्वतःचं आयुष्य पणाला लावणारे आणि गावाला एक वेगळी ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निर्माण करणारे रावसाहेब आप्पा आज प्रत्येक निमगावकराची अस्मिता आहेत. अप्पांनी गावाला नवी ओळख दिली. रावसाहेब मगर आप्पा यांनी आपल्या गावाला म्हणजेच निमगावला देशभरात एक ओळख निर्माण करून दिली आहे. प्रत्येक गावाला एक विशिष्ट ओळख असते, ती भौगोलिक किंवा ऐतिहासिक कारणांमुळे असू शकते. काही गावं मोठ्या रस्त्यांवर असतात म्हणून ओळखली जातात, पण निमगावसारख्या एका छोट्याशा गावाला देशभरात ओळख मिळाली ती केवळ रावसाहेब मगर आप्पांमुळेच.
रावसाहेब मगर आप्पा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुस्ती क्षेत्रासाठी समर्पित केलं. गेली 55 वर्षं ते महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कुस्तीच्या प्रचारासाठी, प्रगतीसाठी आणि प्रसारासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. पूर्वी आप्पा एक मोठे पैलवान म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक मोठ्या पैलवानांना मातीवर लोळवलं होतं, तेव्हापासून आमच्या गावात कुस्तीची परंपरा सुरू झाली. एक काळ असा होता की आमच्या गावातील प्रत्येक घरात एक पैलवान नक्कीच असायचा, आणि आजही तसंच आहे.
गावात तालीम उभारण्यासाठी रावसाहेब अप्पांनी त्यांची स्वतःची जागा दिली व लोक सहभागातून गावामध्ये त्याकाळी प्रचंड मोठी तालीम उभारली गेली आणि अप्पांनी कुस्तीच्या प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, त्यामुळे आमचं गाव “पैलवानांचं गाव” म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आज मी एक वक्ता म्हणून महाराष्ट्रभर व्याख्यानांसाठी गावोगावी जात असतो. एकदा अमरावती जिल्ह्यातील, चांदूरबाजार तालुक्यातील एका गावात माझं व्याख्यान होतं. व्याख्यानादरम्यान जेव्हा मी माझ्या गावाचा उल्लेख केला, तेव्हा व्याख्यान संपल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि विचारलं, “तुम्ही कुठलं गाव म्हणालात?” मी म्हटलं, “माझं गाव निमगाव, मगराचं निमगाव.” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “पैलवान रावसाहेब मगर यांचं गाव का?”
माझ्या अंगावर काटा आला. अमरावती म्हणजे आमच्या गावापासून जवळपास सहाशे किलोमीटर लांब आहे. अमरावतीतल्या एका छोट्या गावात माझं व्याख्यान होतं, आणि तिथल्या लोकांना आमचे रावसाहेब आप्पा माहीत आहेत. माझा अभिमानाने ऊर भरून आला. मनातल्या मनात मी विचार केला, किती मोठं काम केलं आहे आप्पांनी!
आमच्या सोलापूर, सातारा, पुणे भागात कुठेही व्याख्यानाचा कार्यक्रम असला, की निमगाव म्हटलं की रावसाहेब आप्पांचं नाव निघतंच. असा अनुभव मला अनेक वेळा आला आहे. पण अमरावतीतल्या माझ्या त्या अनुभवाने मला विशेष आनंद दिला. या ठिकाणी एक वाक्य अगदी चपखल लागू होतं: “Powerful people make places powerful.”
त्यानंतर आमच्या गावात बरेच मोठे लोक झाले आहेत, मोठमोठे अधिकारी झाले, उद्योजक झाले, आणि त्यांनी गावाला एक वेगळ्या उंचीवर नेलं. पण या सर्वांचं श्रेय आप्पांना जातं. आज महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात त्यांना “पितामह” म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्याच्या मोठ्या व्यक्तींपासून ते नवखे पैलवानांपर्यंत, जेव्हा कुणाच्या मनात कुस्तीचा विचार येतो, तेव्हा सर्वप्रथम जे नाव समोर येतं, ते म्हणजे रावसाहेब आप्पा मगर.
आप्पांच्या कार्यामुळे आणि त्यांच्यामुळे आमच्या गावाला मिळालेली ओळख ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या गावाला “पैलवानांचं गाव” म्हणून मिळालेल्या या ओळखीवर लिहिलेल्या चार ओळी :
पैलवानांचं गाव, आमचं पैलवानांचं गाव… गाव आमचं छोटं, पण मोठं त्याचं नाव…
पैलवानाच गाव आमचं पैलवानाच गाव
लाल माती आमचं गान, लाल माती आमचं जीन…
लाल मातीत पोरगा इथं खेळतो रोज कुस्ती, अभ्यासातसुद्धा लावतो मोठी युक्ती…
नुसतेच नाहीत पोर पैलवान,इंजिनियर डॉक्टरसुद्धा आहेत राव, पैलवानांचं गाव, आमचं पैलवानांचं गाव…
पोरं इथली खातात रोज बदाम आणि खारका, शहरातल्यांसारखा नाही मिळत इथं मावा आणि गुटखा…
नाही खात पोरं बटर आणि पाव, व्यायाम करून रोज मारतो दूधावर ताव…
पैलवांनाच गाव आमचं पैलवणांच गाव
झाल्यावर कुस्ती म्हणतो कसा रावसाहेबांचा पट्टा, नाही करतात कोणी इथं मातीची हो थट्टा…
दाखवायचं दुसऱ्याला आसमान, हेच आमचं ठावं, पैलवानांचं गाव, आमचं पैलवानांचं गाव…
रावआप्पांचा स्वभाव आणि जीवन
रावसाहेब मगर यांचा स्वभाव हा खरोखरच स्पष्टवक्ते, सरळ आणि साधा आहे. त्यांनी नेहमीच त्यांच्या मनात आणि पोटात एकच असलं पाहिजे, या तत्त्वावर ठाम असतात. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे समाजिक जीवनात त्यांच्याकडे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिलं जात. त्यांचा हा स्वभाव संत तुकाराम महाराजांच्या अभांगाशी तंतोतंत जुळतो :
“कळसिया पैजा जिंकेन मी सावळा कोडीं उकललीं सहज बोलिला”
हा अभंग रावसाहेबांच्या जीवनावर पूर्णतः लागू होतो. त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि सरळ वागण्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी सोप्या केल्या, परंतु हे सत्य बोलण्याचे बरेचदा परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागले असतील. तरीही त्यांनी आपला स्वभाव कधीही बदलला नाही. राजकारणात मात्र हा स्वभाव त्यांना काही अडचणींचा सामना करायला लावणारा ठरला. पण राजकारणाच्या चौकटी आप्पांच्या व्यक्तिमत्त्वाला बंदिस्त करू शकत नाहीत. आजच्या युगात, रावसाहेबा अप्पांना सारखे स्पष्ट, प्रामाणिक आणि तोंडावर बोलणारे लोक समाजात फारच कमी उरले आहेत. त्यांच्या या स्वभावावरून आपण सुद्धा शिकल पाहिजे , की सत्याचं बोलणं आणि सरळपणे जगणं हेच खरं जीवन आहे.
रावआप्पा हे खऱ्या अर्थाने स्वच्छंदी व्यक्तिमत्व आहेत. कुस्ती हा त्यांचा ध्यास आणि श्वास, आणि कुस्तीच्या प्रेमामुळेच त्यांनी आपल्या जीवनाला आकार दिला. साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रावसाहेबांनी आपल्या कष्टाने आणि मेहनतीने खूप मोठं यश मिळवलं. त्यांचं कुस्तीवरील प्रेम एवढं अफाट होतं की त्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत कुस्तीतील बारकाव्यांचा अभ्यास करून अथक प्रयत्नांनी सातत्याचा सरावाने स्वतःला मोठं पैलवान बनवलं आणि मोठ मोठ्या पैलवान चितपट करून पराक्रम गाजवला..
त्या काळात कुस्तीच्या मोठ्या तालीमी कोल्हापूर आणि पुण्यात असायच्या, जिथे अनेक पैलवान सराव करायचे. परंतु, साध्या कुटुंबातील पैलवानांना पुणे किंवा कोल्हापूरच्या खर्चात परवडणं शक्य नव्हतं. हे जाणून रावसाहेबांनी नंतरच्या काळात आप्पांनी गावातल्या तालमीत इतर पैलवानांना प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. मग याच तालिमीतून अनेक महान मल्ल घडले, ज्यामध्ये छोटा रावसाहेब मागर, 1988 साली महाराष्ट्र केसरी झाले, तसेच किट्येक पैलवानांनी महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा जिंकल्या. रावसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या पैलवानांनी प्रत्येक क्षेत्रात गाजावला. निमगावमध्ये काही काळ सराव केलेले पंढरपूर तालुक्यातील भारत नाना भालके पुढे जाऊन आमदार झाले. काहीजण ऑल इंडिया चॅम्पियन झाले. आप्पांनी त्यांच्या तालमीच्या भिंतीवर फार प्रेरणादायी सुविचार लिहिले आहेत, तालमिल गेलं की ते समोर दिसणारे सुविचार प्रेरणा देतात. आप्पांनी तालमीत पैलवान घडवताना त्यांच्यावर विचार रुपी संस्कार करून समाजभान असलेली माणसं घडवली.
रावसाहेबांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात मोठं यश मिळवलं. त्यांनी पारंपरिक कुस्तीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून बारकावे लक्षात घेऊन आपले पैलवान आंतरराष्ट्रीय स्तरावर ही खेळतील अश्या प्रकारचे प्रशिक्षण पैलवानांना देत आहेत आणि ग्रामीण भागातही आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल कसे निर्माण होतील येईल याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. आज या वयातही कुस्तीचा त्यांचा अभ्यास अखंडितपणे चालू आहे. यावरून संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आठवतो:
“असाध्य ते साध्य करिता सायास करून अभ्यास तुका म्हणे.”
याचसह, रावसाहेबांचे जीवनाचं तत्त्वज्ञान “मनी वसे तेचि करा रे, भिऊ नका मानवा रे” या संत तुकारामांच्या अभंगात प्रतिबिंबित होतं. त्यांनी आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले, आणि त्यातून मोठं यश मिळवलं.
आजच्या तरुणांनी रावसाहेब आप्पा मगर यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांनी एक ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. आज रावसाहेबांना कित्येक आमदार, खासदार, मंत्री आणि अधिकारी ओळखतात. महाराष्ट्रातील कुस्तीशी निगडीत प्रत्येक गावात रावसाहेबांचे अनुयायी आहेत. रावसाहेb अप्पांकडे अपार संपत्ती आहे, परंतु एवढं असूनही ते अत्यंत साधेपणाने राहतात. त्यांना स्वतःच्या मोठेपणाचा, संपत्तीचा कधीही बडेजाव करायला आवडत नाही. साधेपणा आणि उच्च विचारसरणी हे गुण रावसाहेबांकडून आपण शिकले पाहिजे.
स्वच्छंदी रावआप्पा
रावसाहेबांच्या स्वच्छंदी जीवनातून आपल्याला शिकायला हवं, जे आपल्या मनात आहे तेच साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रावसाहेब हे केवळ कुस्तीगीर नव्हते, तर ते एक उत्तम कलाकारही आहेत. जुन्या काळातील भावगीते त्यांची तोंडपाठ आहेत.
जुने लोक त्यांच्याविषयी एक आठवण सांगतात
आमच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचा गावदेव असतो त्यामध्ये त्याची मिरवणूक गावातून काढली जाते, तशीच राव आप्पांच्याही लग्नावेळी त्यांची मिरवणूक काढली होती आणि ती मिरवणूक जेव्हा त्यांच्या तालमिजवळ आली तेव्हा आप्पांनी त्यांच्या स्वतःच्या मिरवणुकीमध्ये त्यांच्या होणाऱ्या पत्नीला उद्देशून जगदीश खेबुडकर यांच गाणं गायल होत,
धुंद आज डोळे, हवा धुंद झाली, गाली तुझ्या गं कशी लाज आली….
हे आप्पांच सगळ्यात आवडत गाणं… आजही आप्पा हे गान गुंगुणत्तात.
रावसाहेब आप्पांच्या पहाडी आवाजात प्रचंड ताकत आहे, ते भाषण करायला लागले की त्यांच्या विचारातून, भावगीतांमधून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.
मी सदाशिवराव माने विद्यालयात शिकत असताना, ते एकदा आमच्या शाळेत आले होते. साध्या कपड्यात, नेहरू पायजमा घालून आलेले रावआप्पा आपल्या हातात एक पिशवी घेऊन आले होते. एक मोठं व्यक्तिमत्त्व असूनही, ते साध्या माणसाप्रमाणे वागतात. प्रार्थनेची वेळ होती, आणि प्रार्थनेनंतर त्यांनी मुलांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. ते 2004-05 साल असेल. हातात पिशवी धरूनच ते बोलायला लागले आणि एक सुंदर भाषण केलं. त्या वेळी माझी छाती अभिमानाने फुलली होती. भाषणाच्या शेवटी, त्यांनी एक सुंदर कविता म्हटली, ज्याचे शब्द आजही माझ्या कानात गुंजत आहेत:
तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून, उद्या पिकेल सोन्याचं रान चल उचल हत्यार गड्या, होऊन हुशार, तुला नव्या जगाची आन ही आठवण आजही माझ्या मनात ताज्या आहेत. रावसाहेब आप्पा मगर यांच्या स्वच्छंदी आणि साध्या जीवनातून मला नेहमीच प्रेरणा मिळते.

कुटुंबवत्सल माणूस
रावसाहेब आप्पांना एक मोठे भाऊ होते, त्यांचं नाव नानासाहेब मगर. नानासाहेब हे अत्यंत करारी,न्यायप्रिय व एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाचा सोलापूर जिल्ह्यात मोठा दबदबा होता. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन असलेले नानासाहेब हे आप्पांना अतिशय प्रेमाने वागवत. आप्पांच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. नानासाहेब दादा यांनी नेहमी रावसाहेब आप्पांना नेहमीच प्रोत्साहन दिल
त्यांनी गावातील गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठं काम केलं. त्यांच्या या कार्यामुळे आणि कर्तव्यदक्षतेमुळे त्यांची पंचक्रोशीत खूप ख्याती होती.
नानासाहेब मगर, कृष्णा तात्या मगर, आप्पा तात्या मगर, पाटील आबा व आगतराव पाटील अशी काही ही गावातील थोर मंडळी. या सर्वांनी मिळून 40-50 वर्षं गावाचं नेतृत्व केलं. या सर्वांनी मिळून गावातील समस्या सोडवण्यासाठी आणि न्यायप्रविष्ट कारभारासाठी आपले योगदान दिलं. त्यांनी गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले.
हे सर्वजण कोणावरही अन्याय होऊ देत नसत. प्रसंगी एकमेकांशी ताणलेले वादही होत, पण सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याची त्यांची तळमळ नेहमीच होती. आपल्या आजोबांच्या काळातील अशी तीन चार भली माणसं पूर्वी प्रत्येक गावात असायची, ज्यांच्या विचारांनी गावाची दिशा ठरायची. अशाच लोकांचा वारसा पुढील पिढ्यांनी पुढे नेण्याचं काम आज रावसाहेब आप्पा करीत आहेत. काही वर्षांपूर्वी नानासाहेब मगर यांचं निधन झालं, पण शेवटच्या श्वासापर्यंत या भावा-भावांनी एकत्रितपणे संसार केला. आजच्या काळात, जिथे संपत्तीच्या वाटपामुळे भावा-भावांमध्ये भांडणं, मतभेद दिसून येतात, तिथं आप्पा आणि नानासाहेब दादा यांच्यासारखं बंधू प्रेम पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. आजच्या काळात, जिथे नाती-गोती आणि कुटुंब व्यवस्था धोक्यात येते, तिथं नानासाहेब दादा आणि रावसाहेब आप्पा यांचं प्रेम आणि आदर्श अनुकरणीय आहे. अशा आदर्श भावभावांच्या नात्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला हवा.
महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती जपण्यासाठी धडपड
आपल्या गावाला “पैलवानांचं गाव” म्हणून ओळख मिळाल्याप्रमाणेच आणखी एक महत्त्वाची ओळख आहे, ती म्हणजे आमच्या गावातील खंडोबा मंदिर आणि गजी ढोल संघ. आमच्या गावात लोकदेव खंडोबाचं फार मोठं मंदिर आहे, आणि खंडोबाच्या मंदिरासमोर पारंपरिक गजी ढोल नृत्य ही आमची परंपरा आहे. ही परंपरा जपण्याचं काम आमच्या गावातील मंडळी गेली कित्येक दशके करीत आहेत.
आमच्या गावातील गजी ढोल संघ हा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गावातील प्रत्येक घरात किमान एक तरी व्यक्तीला हे लोकनृत्य येतं, आणि याची फार मोठी परंपरा आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येक वर्षी दिल्लीतल्या राजपथावर संचलन होतं, ज्यात प्रत्येक राज्याचा एक रथ असतो आणि त्या राज्यातील लोककलेचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जातं. 26 जानेवारी 1993 रोजी दिल्लीतल्या राजपथावर महाराष्ट्राचं नेतृत्व आमच्या निमगावच्या गजी ढोल संघाने केलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मा. विजयसिंह मोहिते पाटील होते. त्यांच्या प्रयत्नातून आमच्या गावाला ही मोठी संधी मिळाली होती. या संपूर्ण प्रक्रियेत पांडुरंगभाऊ मगर, लक्ष्मण आबा मगर व इतर मंडळी बरोबर रावसाहेब आप्पा मगर यांचंही विशेष योगदान होतं.
आजही आमच्या गावातील गजी ढोल संघ प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय गजी ढोल कार्यक्रमाचं आयोजन करतो. या कार्यक्रमात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या यादीत रावसाहेब आप्पा हे नेहमीच आघाडीवर असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील ही लोककला, लोकपरंपरा, आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी रावसाहेब आप्पा मोठं योगदान देत आहेत.
शिक्षणाविषयी तळमळ
रावसाहेब मगर हे स्वतः जास्त शिकलले नसले तरी त्यांना शिक्षणाबद्दल नितांत श्रद्धा आहे आदर आहे . ते शिक्षणासाठी नेहमीच इतरांना सहकार्य करतात. स्वतःकडे एवढी ताकद असताना ते स्वतःची शाळा काढू शकले असते, पण त्यांनी असं न करता गावातील स्वतंत्रसैनिक नगरकर मॅडम यांनी सुरू केलेल्या जवाहर शिक्षण संस्थेला फार मोठं सहकार्य केलं आहे या संस्थेला स्वतःची संस्था मानून अप्पांनी व त्यांच्या बंधूंनी लाखो रुपयांची मदत या संस्थेस केली आहे. ते गावातील तरुणांना कुस्तीबरोबरच शिक्षणासाठीही प्रोत्साहित करत आहेत. यामुळे मुलं कुस्ती खेळू लागली आणि शाळेत शिकू लागली. कुस्तीचा फायदा त्यांना महाविद्यालयीन जीवनात झाला.
गावातील शाळेत त्या काळी फक्त दहावीपर्यंतच शिक्षण मिळत होतं, तेव्हा आप्पांनी कित्येक तरुणांना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आणि त्यांना सहकार्य केलं. त्यामुळं आज कित्येक तरुण कुस्तीबरोबर शिक्षणाच्या प्रवाहात आले, खेळाला शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे मुलं पुढं आली. कुस्ती आणि शिक्षणाच्या जोरावर कित्येक जण सैन्यात भरती झाले, कुस्त्या खेळून आलेल्या पैशातून शिक्षण घेऊन कित्येक मुलं उच्चशिक्षित झाली. काहीजण अधिकारी झाले, काहीजण शिक्षक, प्राध्यापक झाले. अशा कित्येक घरांतील चुली आज रावसाहेबांच्या कुस्ती आणि शिक्षण या धोरणामुळे पेटलेल्या आहेत. समाजातील कित्येक जण आज मुख्य प्रवाहात जोडले गेले ते कुस्तीमुळे आणि शिक्षणामुळे. शिवाय, आप्पांना देशाविषयी अतिशय प्रेम आणि स्वाभिमान आहे. आमच्या गावात दोन स्वातंत्र्यसैनिक झाले— नगरकर मॅडम आणि देशभक्त बाळवंतराव मगर. यांच्याविषयी आप्पांना खूप मोठा अभिमान आहे.
मन, मनगत आणि मेंदूची ताकद
रावसाहेब आप्पा हे मोठे पैलवान असल्यामुळे त्यांचं शरीर बलवान आहे, पण ते उत्तम वाचक आणि अभ्यासकही आहेत. केवळ शारीरिक बलवान असणं पुरेसं नाही; मन आणि मेंदूसुद्धा बलवान असायला पाहिजे, त्यासाठी मोठं वैचारिक अधिष्ठान असावं लागतं. आणि याच विचारांचे आप्पा आहेत. गावातील लोकांचं प्रबोधन व्हावं, या विचाराने प्रेरित होऊन काही तरुणांनी उभं केलेल्या देशभक्त बाळवंतराव मगर सामाजिक प्रतिष्ठानला रावसाहेब आप्पा नेहमी मदत करत असतात. आमच्या गावात गेली 27 वर्षं निरंतर चालू असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस व्याख्यानमालेत आप्पा आवर्जून हजेरी लावतात, वक्त्यांची मनोगतं ऐकतात आणि व्याख्यानमालेला सदैव हातभार लावतात.
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जपणूक
रावसाहेब आप्पा वारकरी संप्रदायाचं नितांत आदर करतात आणि आपली परंपरा टिकवण्यासाठी नेहमीच आग्रेसर असतात. गेली कित्येक दशके चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ही आमच्या गावाची दुसरी एक ओळख आहे. गावातील काकासाहेब सुर्वे या सप्ताहाचे आयोजन करतात.गावातील लोकांच्या विचारांची समृद्धी वाढावी, यासाठी अध्यात्माचं मोल त्यांनी ओळखलं आहे. रावसाहेब आप्पा ही परंपरा जपण्यासाठी प्रत्येक वर्षी सढळ हाताने लाखो रुपयांची मदत करतात.
आज रावसाहेब आप्पांचं सर्वच क्षेत्रातील योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहे. कुस्तीबरोबरच, सांस्कृतिक, आध्यात्मिक , शैक्षनिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे रावसाहेब आप्पा म्हणजे आमच्या गावाची खऱ्या अर्थाने शान आहेत. आप्पांनी आजपर्यंत कुस्तीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मल्लसम्राट पुरस्काराने सन्मानित केले आहे, तसेच त्यांना विविध सामाजिक संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना मराठा सेवा संघाने सन्मानित करून पुरस्कार दिला आहे ही अभिमानास्पद बाब आहे. असे हे आपल्या सर्वांचे प्रिय रावसाहेब आप्पानी त्यांच्या वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या या गौरवग्रंथात आप्पांविषयी लिहिण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे. यासाठी विशेषत: दत्ता मगर आणि वि.दा. पिंगळे सरांचे आभार मानतो व रावसाहेब आप्पांना त्यांच्या पुढील जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
विक्रमसिंह हनुमंत मगर
(वक्ता, कवी, इतिहास अभ्यासक)
9970027070
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.