मेंढपाळाचा मुलगा सरपंच झाला आणि वडिलांच्या शुभहस्ते ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवला….

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा”, या मुक्ताबाईच्या अभंगाचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात आलेला आहे…
भांब (बारामती झटका)
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन दिन संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील भांब गावचे नूतन सरपंच प्रफुल्ल पांडुरंग काळे उर्फ पप्पू काळे यांनी मेंढपाळ असणारे आपले वडील श्री. पांडुरंग शंकर काळे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा झेंड्याचे पूजन व झेंडा फडकविण्याचे काम वडिलांच्या हस्ते केलेले असल्याने, “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा”, या मुक्ताबाईच्या अभंगाचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असणाऱ्या आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे नेते, कार्यकर्ते व ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना आला आहे.


माळशिरस तालुक्याच्या शिंगणापूर पायथ्याच्या डोंगर कपाऱ्यामध्ये घाटमात्याच्या पायथ्याला भांब गाव वसलेले आहे. शेतीबरोबर मेंढपाळ व्यवसाय अनेक लोक करीत असतात. त्यापैकीच श्री. पांडुरंग काळे व सौ. सिंधुताई काळे सर्वसामान्य शेतकरी व मेंढपाळ कुटुंब आहे. त्यांना प्रफुल्ल व रमेश अशी दोन मुले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या आई-वडिलांना लहानपणापासून मदत करणारी राम लक्ष्मणाची जोडी आहे. प्रफुल्ल यांनी गावांमध्ये सामाजिक कार्यातून आपली राजकीय ओळख निर्माण केलेली आहे. ते पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झालेले आहेत. त्यानंतर उपसरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. गावामधील महत्त्वाचे व प्रतिष्ठित असणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदावर सुद्धा प्रफुल्ल उर्फ पप्पू काळे यांनी काम केलेले आहे. सध्या सरपंच पदाची धुरा त्यांच्याकडे आहे.

आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्कार दिलेले आहेत, त्याच संस्काराच्या शिदोरीवर गावच्या सर्वोच्च सरपंच पदाचा मान मिळालेला आहे. सरपंच गावच्या प्रमुख पदावर असल्याने कार्यक्रमास त्यांना मान असतो. मात्र, ज्यांच्यामुळे आपल्याला जग पाहता आले, जे प्रतिकूल परिस्थितीत पाठीशी ठाम उभा राहिले, असे श्री. पांडुरंग शंकर काळे यांना स्वातंत्र्य दिनाचा ग्रामपंचायत कार्यालयावरील झेंडा फडकवण्याचा बहुमान दिलेला आहे. त्यामुळे “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा”, या उक्तीचा प्रत्यय आलेला आहे.


श्री. पांडुरंग काळे आयुष्यामध्ये अनेक स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास उपस्थित राहिले असतील मात्र, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 79 वा वर्धापन दिनादिवशी पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्याचा बहुमान मुलामुळे आलेला आहे. समाजामध्ये अनेक मुले उच्च पदस्त किंवा उच्चशिक्षित झाल्यानंतर अडाणी व अज्ञानी आई-वडिलांना विसरतात मात्र, प्रफुल्ल उर्फ पप्पू काळे यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



