आता गावागावात, मनामनात बुद्ध रुजायला हवा – प्रा. डॉ. सुभाष वाघमारे

निगडी तर्फ येथे भन्ते दिपंकर यांच्याहस्ते गौतम बुद्धांच्या पुतळ्याची स्थापना
सातारा (बारामती झटका)
जगामध्ये अनेक प्रकारचे तत्वज्ञ होऊन गेले आहेत, पण समता, बंधुता, शांती, विवेक, करुणा, प्रज्ञा, पंचशील या मूल्यांचे आचरण केले तर, सर्वांचे जीवन सुखमय होईल. आपल्या जीवनातील दुःख दूर होईल, असे सांगणारे जगातले विवेकी, कृतीशील विचारवंत तथागत गौतम बुद्ध होते. गौतम बुद्ध हे ईश्वर नाहीत तर हितकारी जीवन मार्गदर्शक आहेत. बुद्ध विहारात आलाय, विचारात व आचारात आणण्याची जबाबदारी आपली आहे. सत्याचा शोध आणि मानवी हिताचा विचार-आचार यामुळे बुद्ध धम्म हा सर्व कल्याणकारी आहे. बुद्धाला शरण जाण्याची गरज नाही. कारण बुद्ध तुमचा प्रेमळ मार्गदर्शक मित्र आहे. आपणच आपले जीवन स्वतः सुखी करायचे आहे, त्याचा मार्ग ते सांगतात. बुद्ध मुक्तीदाता नाही मार्गदाता आहे. मध्यममार्ग हाच जीवनास उपयुक्त कसा ते बुद्धांनी सांगितले आहे. आता गावागावात मनामनात बुद्ध रुजायला हवा, असे मत येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते निगडी तर्फ येथे जेतवन बुद्धविहारामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभात ‘तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म’ या विषयावर बोलत होते. या वेळी भन्ते दीपंकर, संयोजक प्राचार्य प्रकाश रणबागले, विलासराव कांबळे, डॉ. म्हाळगे, रमेश इंजे, नंदकुमार काळे, गुलाब बनसोडे, पत्रकार अनिल वीर, शाहीर श्रीरंग रणदिवे, चंद्रमणी बनसोडे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा धम्म स्वीकार करून आपल्याला माणूस बनवले आहे. गौतम बुद्ध यांचा धम्म वास्तविक जीवनाशी संबंधित आहे. ईश्वर, आत्मा, स्वर्ग, आत्म्याची मुक्ती या गोष्टी काल्पनिक असल्याने यांचा जीवनाशी काही संबंध नाही. प्राण्यांचे बळी घ्या म्हणणारा हा धम्म नाही. धर्म ही मनाशी निगडीत गोष्ट आहे. माणसाने जन्मापासून ते मरेपर्यंत कसे वागावे, जीवनात चांगले आचरण कसे करावे असा विचार करणारा हा धम्म आहे. धर्माचे कार्य सर्वांना सुखी बनविणे हे असते. सर्व मनुष्यमात्रांचे कल्याण कशाने होऊ शकेल, त्यासाठीचे चिंतन करून बुद्धांनी आचार संहिता तयार केली आहे. पंचशील हे केवळ तोंडाने पुटपुटण्याचा भाग नसून हिंसा, चोरी, खोटेपणा, व्यभिचार, दारू किंवा अन्य व्यसने या माणसाच्या दुःखाचे कारण ठरत असलेल्या गोष्टीपासून अलिप्त राहण्याची जीवन पद्धती आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, हित संबंधाचे कलह, तृष्णा याने माणसाची अवनती होते. समाजाच्या भल्यासाठी दुःखाची कारणे नष्ट करणे आवश्यक असते. दुःखाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला धम्म ज्ञान आवश्यक असते. सर्व माणसे समान आहेत, असे सांगणारा जगातला पहिला ज्ञानी माणूस गौतम बुद्ध होय. कोण कोणत्या जातीत जन्मला, कोणत्या घराण्यात जन्मला यावरून माणसाचे श्रेष्ठत्व ठरत नाही. आदर्श वागणूक हाच धम्माचा पाया आहे. सदगुण घेऊन सदाचाराने राहणे हा धम्म आहे. केवळ माणसाने भाकरीसाठी जगू नये तर अन्नाबरोबर ज्ञान, विद्या या गोष्टींना बुद्धाने महत्व दिले. गौतम बुद्धांचा धम्म यथार्थ ज्ञान जाणतो. त्यामुळे विज्ञानवादी आहेच पण विवेकवादी आहे. आपल्या मेंदूत शिरलेल्या पारंपरिक विषम विचारसरणीमुळे, जातीवादी मानसिकतेमुळे आणि रुढीच्या प्रभावामुळे लोक अजूनही बुद्ध समजून घेऊ शकले नाहीत. विचारवंतानी, सुशिक्षितांनी बुद्ध धम्माचे वाचन करून सर्व लोकांना बुद्ध समजून दिला पाहिजे. मनुस्मृती ही विषमता निर्माण करणारी आहे, म्हणूनच तिचे दहन करण्यात आले होते. आपण मानवी समतेचा विचार पुढे घेऊन जात आहोत, यासाठी आपले नैतिक आचरण खूप चांगले हवे असे ते म्हणाले.

प्रारंभी भन्ते दीपंकर धम्म देशना देताना ते म्हणाले की, ‘बुद्ध विहारातून उपासक उपासिका घडले पाहिजे. तरूण वयात भिखू तयार केले पाहिजेत. सातारा जिल्ह्यात भिखू संघ व भिखुनी संघ नाही. मी एकटाच आहे. भिखू संघ असेल तर बुद्ध धम्म वाढीस लागेल. केवळ श्रामनेर शिबीरपर्यंतच मर्यादित राहू नका. अष्टांग मार्गावर चालले पाहिजे. आपल्या मुलांपैकी एक मुलगी किंवा मुलगी धम्म कार्यासाठी दिली पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही तत्वे बाबासाहेब यांनी घटनेत आणली. आज राज्य घटना बदलण्याचे बोलले जाते. पण ही तत्वे अंमलात आली तर बुद्दीजम येईल. आपण जागरूक राहून कार्य करायला पाहिजे. सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात भिक्खू कमी आहेत. जिथे भिखू आणि भिखुनी संघ नसतो तिथे धम्म शून्यवत असतो. भिखू संघ पातीमोक्ष व्हायला पाहिजे. बौद्ध विहार किमान एक एकराचे असावे, तिथे संथागर, ग्रंथालय असायला पाहिजे. प्रसन्न वातावरण हवे. आयुष्यभर भिखू होता येत नसेल तर अगदी सहा महिन्यासाठी देखील भिखू व्हा. सर्व विचार मनोमय आहेत. दुष्टपणाने वागू नका. दुःख टाळू शकू, दुसऱ्याशी प्रसन्नपणाने बोलू आणि वागले तरच सुख प्राप्त होईल. वैर वैराने शमत नाही. प्रेम असायला हवे. आपण या जगात कायमचे राहत नाही. आपल्याला मृत्यूची सदोदित जाणीव असावी. त्यातून कलह नष्ट वाटतात. प्रमादरहित असायला हवे. विपश्यना करून चित्त एकाग्र करून आपले चित्तमळ नष्ट करायला हवेत. आपले चित्त एकाग्र करून आपण धम्म पालन करू शकतो. बुद्धांच्या नंतर धम्म हाच आपला मार्गदर्शक आहे. सर्वांच्या सुख समृद्धी व्हावी म्हणून विहार बांधल्याबद्दल त्यांनी संयोजक यांचे कौतुक केले.

प्रारंभी मूर्तीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पंचशील ग्रहण करून बुद्ध वंदना घेऊन जेतवन विहारात बुद्धांच्या मूर्तींची स्थापना भन्ते दीपंकर यांच्याहस्ते करण्यात आली. प्राचार्य प्रकाश रणबागले यांनी प्रास्ताविक करून कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय हे विहार अनेकांच्या सहकार्याने हे विहार उभे केल्याचे सांगितले. शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी गौतम बुद्ध यांची व अंधश्रद्धा निर्मुलन या विषयाची गीते सादर केली. सतीश जाधव यांनी सूत्र संचालन केले. या कार्यक्रमास निवास कांबळे, द्राक्षां खंडकर, सदाशिव बनसोडे, प्रा. रणधीर मोरे, चंद्रकांत चव्हाण, रविंद्र बडेकर, दयानंद कांबळे, विश्वनाथ गायकवाड, दिलीप फणसे, ए. पी. पवार, म्हस्के सर इत्यादी अनेक बुद्ध विचार प्रसारक व उपासक, उपासिका उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.