माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६०४ उपद्रवी इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई
माळशिरस (बारामती झटका)
दि. ७/५/२०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून माळशिरस पोलिसांनी एकूण ६०४ उपद्रवी इसमाविरूद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्यामध्ये सीआरपीसी १४४ प्रमाणे ७० इसमांना हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
सीआरपीसी ११० प्रमाणे ज्या इसमाविरुद्ध दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत, अशा इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँड लिहून घेण्यात आले आहेत. तसेच ज्या इसमांविरुद्ध दारूबंदीच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त केसेस आहेत, त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बाँड लिहून घेण्यात आलेले आहेत. तसेच काही दारू विकणारे इसमांना हद्दपार करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे काही इसमांना तडीपार करण्यात आले आहे. सीआरपीसी १०७ प्रमाणे ४१५ इसमांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
पिलीव घाटात व जळभावी घाटात नाकाबंदी सुरू असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच दोन भरारी पथके तयार करून आचारसंहितेच्या भंगाविरुद्ध घडणाऱ्या घटनेचा कसून शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे. तसेच दि. ५/५/२०२४ रोजी रात्री व दि. ६/५/२०२४ रोजी रात्री रात्रभर वेगवेगळ्या भागात पोलीस तैनात करून कसून तपासण्या करण्यात येणार आहेत.
आचारसंहिता भंग करणाऱ्या इसमांविरुद्ध आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. कोणीही कायद्याचा भंग करू नये, तसेच सर्व नागरिकांनी मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.