ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरसचे डॉ. विकास काळे यांच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील अटकपूर्व जामीनावर २१ तारखेला सुनावणी होणार..

वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू

माळशिरस (बारामती झटका)

फलटण तालुक्यातील पिंपरी या गावाजवळील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांचे पितळ वाई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वाई, फलटण, माळशिरस असे कनेक्शन समोर आले आहे. माळशिरसचे डॉक्टर विकास काळे यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता. पाच फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार होती मात्र, आणखीन दोन संस्थेत डॉक्टरांनी अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे. यावर पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.

फलटण तालुक्यातील राजाळे येथील डॉ. संतोष निंबाळकर आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील डॉ. विकास काळे यांची नावे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाली आहेत. या दोघांचा गर्भलिंग निदान प्रकरणात कसा सहभाग आहे, याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेने पोलिसांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून तिच्या सांगण्यावरून पोलिसांना अत्यंत महत्त्वाचे धागेद्वारे हाती लागले आहेत. गर्भलिंग निदान चाचणीसाठी डॉ. विकास काळे यांनी कारमधून महिलेला उसाच्या फड्यात नेले. त्यावेळी कारमध्ये त्या महिलेसह आणखी तीन महिला होत्या. प्रत्यक्ष गर्भलिंग चाचणीच्या ठिकाणी डॉ. संतोष निंबाळकर असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्या दिवशी एकूण बारा महिलांची गर्भलिंग निदान चाचणी या दोन्ही डॉक्टरांनी केली असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

उसाच्या फडात डॉ. संतोष निंबाळकर आणि डॉ. विकास काळे यांनी गर्भ निदान केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे, असे असताना केवळ डॉ. विकास काळे यांचा वाई पोलिसांकडून तपास केला जातोय. अद्यापही डॉ. संतोष निंबाळकर यांना अटक केली नाही. केवळ ते फरार आहेत असे सांगितले जाते. एवढा गंभीर गुन्हा घडवूनही पोलिसांना आरोपी सापडत नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गर्भलिंग निदान प्रकरणात फलटणमधील डॉक्टरांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना लगेचच अटक होणे अपेक्षित होते. तसेच ज्या मशीनच्या साह्याने तपासणी झाली ते मशीन ताब्यात घेणे आवश्यक होते. पण, याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट डॉक्टरांना पुरावे लपविण्यासाठी वेळ देण्यात आला आहे, असे बोलले जात आहे.

गर्भलिंग निदान प्रकरणात गुन्हा दाखल होऊन जवळपास दीड महिना उलटून गेलेला आहे. त्या दिवसापासून वाई पोलीस तपास करीत आहेत. वास्तविक संशयित डॉक्टरांना या प्रकरणात तातडीने अटक होणे गरजेचे होते मात्र, अद्यापही अटक झाली नाही. आता गर्भपात केल्यानंतर भ्रूण नष्ट करून त्याचे पुरावे सुद्धा रफादफा करण्यात आले असतील. संशयितांना दीड महिन्याच्या पुढे अवधी मिळाल्यामुळे संशयितांच्या अटकेनंतरही पोलिसांच्या हाती काय लागेल, अशी शाश्वती नाही. संशयितांच्या अटकेला एवढा वेळ का लागतोय ?, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सदर घटनेचा अधिक तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहाय्यक फौजदार विजय शिर्के व पोलीस पथक गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button