मंगळवेढ्यातील लाच प्रकरणामुळे महसूलची बदनामी
वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेतल्याने खळबळ; सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागातील
मंगळवेढा (बारामती झटका)
मंगळवेढा, ता. २ वाळू कारवाईतील जप्त वाहन सोडण्यासाठी चक्क प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदाराने उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव सांगून घेतलेल्या लाच प्रकरणाने जिल्ह्यात मंगळवेढा महसूल खात्याची बदनामी झाली. २८ जुलै रोजी झालेल्या या कारवाईत नायब तहसीलदाराने जबाबात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव घेतल्याचे सांगितल्याने या लाच प्रकरणाची महसूल आवारात मोठी चर्चा आहे.
मंगळवेढ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आत्तापर्यंत टाकलेल्या सर्वाधिक कारवाया महसूल विभागात करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुरवठा निरीक्षक, दोन मंडल अधिकारी, तलाठी आणि आता नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक हे दोघे लाच पथकाच्या सापळ्यात अडकले आहेत. सांगोल्यातील वाळू कारवाईतील वाहन सोडवण्यासाठी परवानगी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व स्वतःचे नाव सांगून २० हजारांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये घेताना नायब तहसीलदार प्रकाश सगर आणि महसूल सहाय्यक विजय ढेरे यांना नुकतीच अटक केली. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली असली जरी महसूल विभागांमध्ये त्यांच्याच कामासाठी येणाऱ्या नागरिकांना छळण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे सातत्याने महसूल विभागाच चर्चेत राहिला.
आतापर्यंत कनिष्ठ कर्मचारी सापडत होते, यावेळी चक्क वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून घेतलेली लाच हे अधिकच चर्चेचे ठरले आहे. त्यामुळे पावसाने झोडपले, निसर्गाने नाकारले, राजाने छळले आणि नवऱ्याने मारले तर फिर्याद कुणाकडे न्यायची या पद्धतीने वरिष्ठ अधिकारी देखील या गोष्टीला खतपाणी घालत असल्यामुळे आता न्याय कुणाला मागायचा, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
महामार्ग भूसंपादित मोबदल्या प्रकरणी संशयाची सुई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असताना त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याला अलगद बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांचा बळी देण्यात आला. मात्र, या प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सोडून घेतलेल्या लाचेमुळे लाचलुचपत खाते मुळाशी जाणार का ?, असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.
जनता दरबाराची गरज
शहर व ग्रामीण भागातील नागरिकांची कामे हे महसूल विभागाकडे सर्वाधिक असतात. त्यामध्ये पुरवठा विभाग, रेकॉर्ड, श्रावणबाळ, नॉनक्रिमेलियर, जातीचे व उत्पन्नाचे, महसूल संदर्भातील दस्तऐवज यासाठी या विभागाकडून सातत्याने रखडवले जात आहे. महिन्यातून एकदा अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांचा जनता दरबार ठेवल्यास यामध्ये तक्रारी आणि बदनामीचे प्रमाण कमी होऊन महसूल खात्याची प्रतिमा उजळण्यास मदत होईल, अशी नागरिकांची भावना आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.