तरंगफळ येथे मातीचे पूजन करून सेंद्रिय शेतीची घेतली शपथ

तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय गटाची स्थापना केली आहे. त्याचाच भाग म्हणून आज सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मुठभर माती घेऊन त्याची पूजा केली व सेंद्रिय शेती करणार, अशी शपथ घेतली.
वेदकाळापासून भूमीला आपण आई मानले आहे. या काळ्या आईवरच हजारो वर्षापासून संपूर्ण सृष्टीचा समतोल साधून अमृतासारखे अन्न देणारा निसर्ग, पूरक शेती आपल्या देशात होत आली परंतु, सत्तरच्या दशकामध्ये स्वीकाराव्या लागलेल्या हरितक्रांतीनंतर रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या अतिवापरामुळे जमिनीचा आत्मा असलेली जिवाणू सृष्टी संपत चाललेली आहे. आज भारतातील एकूण शेती जमिनीच्या सुमारे 30 टक्के जमीन नापीक झाली आहे. दरवर्षी प्रती हेक्टर 15 टन सुपीक माती शेतातून वाहून जात आहे. जमिनीला केवळ पैसे कमाविण्याचे साधन मानण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्या काळी आईचे अतिशय शोषण होत आहे. निकट भविष्यातील हे भीषण संकट ओळखून आजच सर्वांनी जागे होण्याची गरज आहे. या दृष्टीने तरंगफळ गावात भूमी सुपोषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी शेतकरी सपत्नीक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा यांच्या वतीने आलेल्या सेंद्रिय निवेष्ठांचे वाटप शेतकरी सभासदांना करण्यात आले. पूजन केलेली माती प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकली व आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला रासायनिक खतापासून, कीटकनाशकापासून होत असलेल्या आजारपणातून वाचविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी सर्व सभासद शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.