ताज्या बातम्यासामाजिक

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा महोत्सव साजरा होणार

१ मे पासून मोठ्या उत्साही वातावरणात साजरी होणार असुन यानिमीत्त विविध धामीॅक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची देवस्थान ट्रस्टची माहीती

मोहोळ (बारामती झटका)

मौजे अंकोली ता. मोहोळ येथील ग्रामदैवत भैरवनाथाबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, भारत खंडातील दंडकारण्य हा प्रांत महापुण्यस्थळ आहे. जेथे देवरुषी, महषीॅ, तपस्वी, मुनिजन नित्य तपस्या करीत असताना अशा समयास काशी विश्वनाथांचे क्षेत्ररक्षक द्वारपाल श्री कालभैरव यांची अतिश्रद्धेने पुजा, अर्चा, ध्यानधारणा करणारी एक गोपी (गौळण) आपल्या गवळीवाड्यात रहात असे. तो गवळीवाड्याचा भाग आजही गोपी या नावानेच ओळखला जातो. तेथील जमीन ही पिकाऊ आहे व त्या शेतास गोपी हेच नाव सध्या चालु आहे.

एकदा नित्य ध्यान मग्न असणाऱ्या गोपीस गाईची धार काढण्यास सांगीतली असता ती गोपी हातात भांडे घेऊन वांझ कपिला गाईची धार काढण्यासाठी गेली व धार काढू लागली. त्यावेळी भांडे दुधाने भरलेले आहे व खाली फेसाचा मोठा ढीग पडलेला आहे, असा चमत्कार घरातील सर्व माणसांनी पाहीला. धार काढताना भक्तीरसात तल्लीन झालेल्या गोपीस समाधी अवस्थेतुन दुर केले. त्याचवेळी गाईचा एक खुर त्या फेसावर पडला व त्या फेसरूपी पिंडीमध्ये गोपीला श्री भैरवनाथाचे अलौकीक दर्शन झाले व ती समाधान पावली. ती फेसरूपी स्वयंभू पिंड, त्यावर गाईच्या खुराचा व्रण अशा स्वरूपात येथे अस्तित्वात आहे. अशा पिंडीची रोज पुजा केली जाते.

संपुर्ण सोलापुर जिल्हा व परिसरातील सांगली, सातारा, कोल्हापूर, लातुर, उस्मानाबाद तसेच कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक व धामीॅक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजता देवाच्या सभा मंडपात वाघ्या मुरळीचा जागरण गोंधळ, याच दिवशी रात्री १२ नंतर महिला व पुरुष ओल्या पडद्याने दंडवत घालून आपला नवस फेडतात. बुधवार दि. १ मे रोजी पहाटे ५ वाजता देवाचा अक्षता सोहळा व याच दिवसाला गावकऱ्यांची अष्टमी म्हटली जाते. या दिवशी गावकरी नाल बसवणे, पुरणपोळीचा नैवद्य देवास दाखवितात. याच दिवशी दुपारी ४ वाजता पंचक्रोशितील सुवासिनी आरती घेऊन देवास जातात. पुरुष मंडळी शेरणी वाटतात. तर ७ वाजता देवाचा रुकवत वाजत गाजत मंदिरात येतो. गुरुवार दि. २ मे रोजी यात्रेकरुंची अष्टमी असते. या दिवशी दाखल झालेले सर्व भाविक आपला नैवद्य पुजारी, गडशी-गोसाव्या मार्फत देवास दाखवितात. शुक्रवार दि.३ मे रोजी रात्री १० वाजता शोभेच्या दारूकामाने या यात्रेची सांगता होणार आहे. याशिवाय यात्रा काळात दररोज रात्री ९ वाजता देवाचा पालखीसह सवाद्य छबीना निघणार आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नदान केले जाणार आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय केली आहे. ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी मोहोळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टी व गावकऱ्यांच्या च्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button