मोपलवारांवर कुणाचा ‘साया’? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया!
मुंबई (बारामती झटका)
एक आयएएस अधिकारी २६ वर्षांच्या सेवा काळात किती कोटी कमावू शकतो ? काही कल्पना करता येते का ? स्वत:च्या नावावर १५०० कोटी, दुसऱ्या बायकोच्या नावावर १५० कोटी, तिसऱ्या बायकोच्या नावावर ३०० कोटी, पहिल्या मुलीच्या नावावर ५०० कोटी, दुसऱ्या मुलीच्या नावावर ३५० कोटी आणि भावाच्या नावावर २०० कोटी रुपयांची संपत्ती… म्हणजे एकत्रित आकडा मिळून ही रक्कम होते तब्बल ३००० कोटी ! या सरकारी अधिकाऱ्याचं नाव आहे राधेश्याम मोपलवार… हा अधिकारी इतक्या साऱ्या संपत्तीचा मालक बनला तरी कसा ? मोपलवारांवर कुणाचा ‘साया’ ? तीन बाया आणि जमवली बक्कळ माया!
समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी त्यांच्या २६ वर्षांच्या सेवा काळात ३००० कोटी रुपयांची माया जमवल्याचा खळबळ जनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. राधेश्याम मोपलवार यांनी अदानी आणि अंबानी यांनाही मागे टाकलं आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार विकत घ्यायला मोपलवारांच्या पैशांचा वापर केला गेला का, असा खडा सवाल देखील रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या घरातील कोणत्या सदस्याच्या नावावर किती संपत्ती आहे, याची यादी जाहीर केली आहे.
राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर – १५०० कोटी
दुसऱ्या बायकोच्या नावावर – १५० कोटी
तिसऱ्या बायकोच्या नावावर – ३०० कोटी
पहिल्या मुलीच्या नावावर – ५०० कोटी
दुसऱ्या मुलीच्या नावावर – ३५० कोटी
भाऊ सदानंद मोपलवार यांच्या नावावर – २०० कोटी एकत्रित रक्कम एकूण – ३००० कोटी
राधेश्याम मोपलवार यांनी आयएएस अधिकारी म्हणून २६ वर्षे सेवा बजावली. पण या २६ वर्षांमध्ये कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. मोपलवार यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तसेच कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्याच देखरेखीखाली समृद्ध महामार्गाची बांधणी झाली आणि त्यांनी स्वतःच्याच समृद्धीत वाढ केली.
राधेश्याम मोपलवार हे आजच्या घडीला देशातील श्रीमंत अधिकारी म्हणून ओळखले जातात. दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील राधेश्याम मोपलवार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र २०१८ मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्पुरती कारवाई करून नंतर थेट मोठी जबाबदारी दिली. मोपलवार निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वॉर रूमचे प्रमुख कसे काय ?, यावरही रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
राधेश्याम मोपलवार यांची भारत आणि भारताबाहेर अशी मिळून एकूण ३ हजार कोटी मालमत्ता आहे. समृद्धी महामार्गाच्या कामाबाबत चार महिन्यात पुन्हा टेंडर काढले आणि त्यात वाढीसाठी मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर हे टेंडर ५५ हजार कोटींवर गेले. त्यामुळे समृद्धी नेमकी कुणाची झाली ?, सर्वसामान्य माणसांची झाली ?, की अधिकाऱ्यांची झाली ?, हे यातून कळून येतं अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.
समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्र. ११ च काम गायत्री प्रोजेक्टला देण्यात आले. हे टेंडर १९०० कोटी रुपयांचं होतं. पुढे २०२१ मध्ये हे काम जमणार नाही, असं गायत्री प्रोजेक्टकडून सांगण्यात आलं. त्यानंतर हेच काम हुजूर मल्टीप्रोजेक्टला देण्यात आलं.
आता ही हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनी कोणाची ?, हे ही सविस्तर पाहूयात. या कंपनीत एकूण १ कोटी ५२ लाखाचे समभाग आहेत. यापैकी २३ लाख समभाग दस्तूर खुद्द मोपलवार कुटुंबियाकडे आहेत. राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीचे ३ लाख ९८ हजार समभाग आहेत. तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे २३ हजार ६४५ समभाग आहेत. शिवाय हुजूर मल्टी प्रोजेक्टचे ४ लाख ९८ हजार समभाग असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार यांची आहे. म्हणजेच समृद्धीच्या कामातून मोपलवार यांनी स्वतःच्या कुटुंबासह कंत्राटदारांचंही भलं केलं आहे.
या राधेश्याम मोपलवार यांच्या नावावर घोटाळेच घोटाळे जमा आहेत. मोपलवार यांच्या नावावर जमा झालेले कोणते घोटाळे आहेत ते पाहुयात.
घोटाळा क्र. १ जालना-नांदेड समृद्धी महामार्ग जमीन घोटाळा
जालना-नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना १ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप जालनाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गेल्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात केला होता. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली होती. जालना-नांदेड या समृद्धी महामार्गाचा प्लॅन ३ वर्षांपूर्वी लीक झाला होता. हा महामार्ग होणार असल्याची कल्पना येताच काहींनी ग्रीन झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात खरेदी केल्या आणि जमीन खरेदी केल्यावर त्या ठिकाणी रातोरात फळबागा दाखवत कोट्यावधी रुपये मिळवले.
घोटाळा क्र. २ तेलगी स्टॅंम्प पेपर घोटाळा
स्टॅंम्प पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आलीये. १९९५ मध्ये स्टॅंम्प कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगीला स्टॅंम्प आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी कोर्टात दिली होती.
घोटाळा क्र. ३ भ्रष्टाचाराचा आरोप : कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
समृद्धी महामार्ग प्रकरणी एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एका मध्यस्थामध्ये सेटलमेंट सुरू असल्याचे संभाषण होतं. या ऑडिओमध्ये समृद्धी महामार्गातील जमीन लाटल्याचं देखील सांगितलं जात होतं. या ऑडिओ क्लिप वरून राज्य सरकारने मोपलवार यांना एमएसआरडीसी च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून दूर केलं खरं मात्र, त्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने मोपलवारांना क्लीन चीट दिली.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहे. मात्र सत्ता महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीची, सनदी अधिकारी मोपलवार यांच्यावर कायमच सत्ताधाऱ्यांची मेहर नजर राहिली आहे. निवृत्तीनंतर तब्बल सात वेळा मोपलवार यांना विक्रमी मुदतवाढ मिळाली. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्वांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मोपलवार यांना मुदतवाढ मिळाली होती, हे विशेष. यालाच म्हणतात सत्ताधारी मेहरबान तो…
मोपलवार २०१८ मध्ये निवृत्त झाले होते. पण निवृत्तीनंतरही त्यांना तब्बल सात वेळा विक्रमी मुदतवाढ देण्यात तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता, अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही, मोपलवारच का ?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहेत.
आपल्या विविध कारणामुळे चर्चेत आलेले राधेश्याम मोपलवार नेमके आहेत तरी कोण ?
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी
नांदेड येथे शिक्षण
डाव्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी चळवळीत काम
तत्कालीन मराठवाडा ग्रामीण बँकेत नोकरी
एआयबीइए या डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनेत सक्रिय
एमपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती
१९९५ मध्ये युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत
नांदेडच्या गुरु-ता-गद्दी सोहळ्याशी संबंधित काम मोपलवार यांच्याच देखरेखीखाली पूर्ण
केंद्र सरकारच्या २ हजार कोटींच्या निधीतून नांदेडमध्ये रस्त्यांसह विविध विकासकामे पूर्ण
त्यानंतर रस्ते कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित
कोकणचे विभागीय आयुक्त, ठाण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम
ठाणे विभागीय आयुक्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक
दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशीही जवळीक
भ्रष्टाचाराचे आरोप मात्र, राज्यकर्त्यांच्या जवळीकीमुळे कठोर कारवाई नाही
२०१८ मध्ये सेवानिवृत्त
त्यानंतर शासनाकडून मुदतवाढ, समृद्धी महामार्गाच्या कामाची सोपवण्यात आली जबाबदारी
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त सेवानिवृत्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार चर्चेत आले. पण या आयएएस अधिकाऱ्यांनी लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे अपेक्षित असताना त्यांनी स्वतःचंच कल्याण करून घेतलं. प्रभावी राजकीय नेत्यांचा वरदहस्त लाभला की खाओ और खिलाओ असा प्रकार सुरू होतो. आणि जनतेचे नोकर म्हणून पदावर असलेले अधिकारी जनतेलाच लुटून खाण्याचं काम करतात. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनुसार समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी ३ हजार कोटी रुपये कमावले आहेत. त्यांनी आयएएस म्हणून २६ वर्ष सेवा बजावली मात्र, या २६ वर्षात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. २६ वर्षांच्या सेवेत ३ हजार कोटी रुपयांची संपत्ती हे कसे शक्य आहे. प्रामाणिकपणे काम करणारा अधिकारी इतकी संपत्ती गोळा करू शकतो का ?, याचे उत्तर नाही असंच आहे. अर्थात या अशा खाऊ अधिकाऱ्यांना राजकीय साथसंगत आणि अभय लाभल्याशिवाय त्यांच्याकडून असे गैरप्रकार घडणे शक्य नाही. हे सांगण्यासाठी कुठल्याही तत्ववेत्याची गरज नाही.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I just could not leave your web site before suggesting that I really enjoyed the standard information a person supply to your visitors Is gonna be again steadily in order to check up on new posts