तालुक्यात १२ ऑक्टोबर रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचे आयोजन

बारामती (बारामती झटका)
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांचे पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.
तालुक्यात ग्रामीण भागातील २५ हजार ४१८ आणि शहरी भागातील ८ हजार १२४ असे एकूण ३३ हजार ५५२ बालकांना लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार, एसटी बस स्थानक, रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या सीमा या ठिकाणी विशेष लसीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.
प्रशासनाची जय्यत तयारी : पोलिओ लसीकरणाकरिता २८२ बूथ उभारले जाणार आहेत. याकरिता एकूण ६३८ कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहे. या मोहिमेअंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना १४ ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत गृहभेटीद्वारे पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे.
तहसीलदार गणेश शिंदे आणि गट विकास अधिकारी किशोर माने : या लसीकरण मोहिमेत जबाबदार पालक म्हणून सहभागी व्हा. आपल्या व परिसरातील ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब लसीकरण करुन घ्यावे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



