नातेपुतेत लग्नाआधी उघड झाली फसवणूक

‘दक्ष वैद्य’ निघाला इक्बाल शेख
नातेपुते (बारामती झटका)
स्वतःला ‘दक्ष केशव वैद्य’ असे सांगत बनावट आधारकार्ड व पॅनकार्डद्वारे तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाची तयारी सुरू असतानाच तो तरुण इक्बाल शेख असल्याचे उघड झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. यात नातेपुते पोलिसांनी सखोल चौकशीअंती त्या तरुणाला ११ मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या नातेपुते येथील २५ वर्षीय तरुणीशी इक्बालने स्वतःचे नाव दक्ष केशव वैद्य (रा. उंबरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. बाणेर-पाषाण, लिंक रोड, पुणे) असे सांगून ओळख वाढवली. त्यासाठी त्याने बनावट आधार व पॅनकार्ड तयार केले होते. तो स्वतः हिंदू असल्याचे सांगत होता. सप्टेंबर २०२५ पासून त्याने पहिल्यांदा त्या तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी मैत्रीचा हात पुढे केला. त्याचवेळी प्रेमाच्या शपथा घेऊन त्याने तरुणीच्या आई-वडील व नातेवाइकांशीही संपर्क ठेवत स्वतःबद्दल खोटी माहिती दिली.
पहिल्या बायकोचा आला कॉल…
तरुणीच्या आईला पुण्यातून एका अज्ञात महिलेचे वारंवार फोन आले. संबंधित व्यक्ती विवाहित असून तो हिंदू नसून मुस्लिम असल्याचे ती महिला सांगत होती. त्याच्यापासून दोन अपत्ये असल्याची माहिती तिने दिली. यानंतर कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. तरुणीच्या चुलत्याने उंबरे (ता. राहुरी) येथे जाऊन स्थानिक पोलिस पाटील व ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, त्या नावाचे कुटुंब गावात नसल्याचे समजले. कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. ती महिला त्याची पत्नी असून तिच्यासोबत आंतरधर्मीय विवाह झाल्याची माहिती पुढे आली. यानंतर कुटुंबीयांनी नातेपुते पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.
सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी सखोल तपास करून आरोपीची खरी ओळख उघडकीस आणली. पोलिसांनी १० मार्च रोजी त्याला ताब्यात घेतले. ११ मार्च रोजी माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.
अशी मिळवली सहानुभूती…
कोरोनात आई-वडील वारले आहेत. भाऊ मुंबईत नोकरी करतो. गावी सहा एकर बागायती शेती असून स्वतःचे घरही आहे असे त्याने सांगितले होते. तो तरुणीकडे लग्नासाठी आग्रह धरत होता. तिच्या कुटुंबीयांनाही तरुणीचा हात मागत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीच्या होकारानंतर तिच्या आई-वडिलांनीही विवाहाची तयारी केली होती. पण, काही दिवसांनी वस्तुस्थिती समोर आली आणि पिडिता वडिलांसह पोलिसांत पोचली.
ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पालकांनी आपल्या मुलींच्या संपर्काबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मोबाईलद्वारे होणाऱ्या ओळखींबाबतही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. – विशाल वायकर, सहायक पोलिस निरीक्षक, नातेपुते
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



