निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाका
भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ना. गडकरी यांच्या सूचना
कुर्डूवाडी (बारामती झटका)
कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्य अभियंता यांना दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भाजपा सरचिटणीस योगेश पाटील यांनी भेट घेऊन कुर्डूवाडी-पंढरपूर पालखी मार्गाचे काम निकृष्ट झाल्याबाबत निवेदन दिले होते.
कुर्डूवाडी-पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याचबरोबर बावी व रोपळे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती त्यांनी केली. ना. गडकरी यांनी याची तातडीने दखल घेऊन मुख्य अभियंता यांना फोन करून कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्याचे काम निकृष्ट झाले असेल तर ज्या ठेकेदाराने ते काम केले आहे, त्यास काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बाजूला असलेली काटेरी झुडपे काढावी, रस्त्याला पडलेल्या भेगा व खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजकुमार पाटील, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य वडशिंगे गावचे सरपंच दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.