ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची – ७ – ॲड. शारदा वाडेकर

पुणे (बारामती झटका)
‘म्हनी माय म्हनी माय ! जशी दूधवरनी साय !!
तीच म्हनी सावित्रीमाय व तीच म्हनी पहिली गुरूमाय !!
ती माले म्हणे तू तुना पायवर उभं राव्हान !
तोवर लगीन नहीं करान !!
बाईन नवरावर पैसा अडकाना भरवसा करू नाही ! त्यानामुळे बाईनी घरमा किंमत राहतं नाही.!
म्हणून तूले हात जोडीसनी सांगस तू खूप शीकी सवरीशीनी मोठी व्हय !!
आज मीभी मना पायवर उभीं राहती !
ते माले सवत नहीं राहती !!
म्हन उधारण ध्यानमा धर !
नी व्हय शिकीसवरीसनी पदवीधर !!’
‘आईचे हे लहानपणापासूनचे अहिराणीतले बोल मनात घर करून राहिले आणि मनात निश्चय केला शिक्षण घेताना कितीही अडचणींना तोंड द्यावे लागले तरी शिक्षण पूर्ण करायचे आणि नोकरी देखील चांगल्या हुद्यावरची घ्यायची. मीच नाही तर तिच्या पाचही मुलांनी तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. परंतु तिने आयुष्यात जे काही दुःख कष्ट सहन केले, तिच्या मनाविरुद्ध तिला जे सतत जगावे लागले त्याचे गंभीर मानसिक परिणाम तिच्यावर अल्झायमरच्या स्वरूपात दिसू लागले आहेत. आज ती आमच्यासोबत आहे पण ती आम्हाला आम्ही तिची मुले आहोत हे ओळखू शकत नाही. आम्ही आई हाक मारली तर ती ‘ओ’ देऊ शकत नाही. बाईला तिच्या मनाविरुद्ध, मन मारून असं का जगावं लागतं ?जगातील अशा किती आया असतील ? आर्थिक परावलंबित्व हे कौटुंबिक हिंसाचाराच प्रमुख कारण आहेच पण त्याला सामाजिक देखील कारणे आहेत. तिने आम्हाला वेळीच सावध केले पण ती स्वतः तिच्या आयुष्यात बेसावधच राहिली.’ ॲड. शारदाताई अशा शब्दांत आपले मन मोकळे करत होत्या.
खानदेशातील अंमळनेर हे साने गुरूजींचे गाव हेच शारदाताईंचे गाव. आदिवासी पारधी समाजातून येऊन स्वकर्तृत्वाने आज उभ्या महाराष्ट्रात आपले नाव पोहोचवणाऱ्या ॲडव्होकेट व सामाजिक कार्यकर्त्या, महिलांच्या अन्याय अत्याचाराविरोधात लढणाऱ्या शारदाताई. अभ्यासू पण डॅशिंग व्यक्तिमत्व लाभलेल्या. लहानपणापासूनच बंडखोर. पाळी आल्यावर १ वर्ष घरी लपवून या काळात देवीची पूजा वगैरे करणाऱ्या. घरच्या संस्कारामुळे सतत मनात काहीतर चूक केलीय असे वाटून रात्रभर झोप आली नाही असे सांगत होत्या. आणि हिला पाळी का येत नाही म्हणून आईने दवाखान्यात दाखवायची तयारी केली. तेव्हा घरी सांगितले आणि मी हे काही पाळणार नाही असे सांगून मला व देवीला काही झाले नाही असेही सांगितले. ही ताईंची पहिली बंडखोरी.
वडील पारधी समाजातील पहिले बी.एस.सी. व आई ७ वी. ५ भावंडे. सासरी व माहेरी शिक्षणाचे वातावरण असल्याने सर्वांना शिकतां आलं. आईने आपल्या बहिणीला शिकायला आणले. पुढे वडीलांनी मावशीशी लग्न केले व घरचे वातावरण बिघडले. अशा घरच्या वातावरणामुळे लग्न या संस्थेवरचा ताईंचा विश्वासही उडाला होता.
घरात कोणीतरी वकील व्हावं ही वडीलांची इच्छा होती. पण ताईंना इंजिनिअर व्हायचं होतं. मोठ्या भावाला पुण्यात शिकायला पाठवायच ठरलं व त्याच्यावर लक्ष ठेवायला म्हणून ताईंना पण पुण्यात शिकायला पाठवलं. १२ वीला पुण्यात वाडिया कॅालेजात व संत जनाबाई वसतिगृहात प्रवेश घेतला. हे मागासवर्गीय मुलींचे होस्टेल होते. येथे मुलींचे शोषण होत होते. रेक्टरच्या पुरूषमंडळींचे हातपाय दाबायला मुलींना नेले जायचे. तेथे जेवणही चांगले नव्हते. पुलाखालील अस्वच्छ भिकारी बायका कमी पैशात स्वयंपाकासाठी आणल्या जात होत्या. वसतिगृहात जास्त मुली मराठवाड्यातील असल्याने पर्याय नाही म्हणून सहन करत होत्या. येथे ताईंनी दुसरी बंडखोरी केली.
ताईंनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना मुलींच्या सह्या घेऊन तक्रारींचे निवेदन दिले व येथे भेट द्या अशी विनंती केली. शिवाय मुलांचे संत ज्ञानेश्वर वसतिगृहातील मुलांसह एकत्र बंद उपोषण केले व ते यशस्वी झाले. यामुळे अन्यायासाठी संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर आले पाहिजे, सनदशीर मार्गाने आपण लढा दिला पाहिजे यावर शिक्कामोर्तब झाले. या आंदोलनात मोहन वाडेकर मित्र भेटला. पण हा आंदोलनाचा प्रताप भावाने घरी सांगितल्याने ताईंची रवानगी घरी झाली. त्यांना १ ते दीड वर्ष गावी डांबून ठेवले. ताईंनी पुण्याला पाठवू नका पण शिक्षण थांबवू नका अशी विनंती केल्याने कॅालेजला जळगांवला प्रवेश घेतला. पुण्यात रेक्टरच्या गळ्यात चपलांचा हार घातल्याने सरकारी होस्टेलमधे ताई प्रसिध्द होत्या. जळगांव होस्टेलला मोहन वाडेकरांचे एक पत्र आले. त्यांनी ताईंच्या आईवडीलांची अंमळनेरला जाऊन भेट घेतली. पण ताईंच्या वडीलांनी मोहन यांची पोलिसांकडे तक्रार केल्याने मोहन वाडेकर पुन्हा पुण्यात आले. पण ताईंनी पुन्हा दीड वर्षांनी पुण्यात येऊन कायद्याचे शिक्षण सुरू केले. दोन वर्ष झाली की मी आंतरजातीय विवाह करणार आहे असे घरी सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण घेताना मित्र म्हणून भेटलेला मोहन वाडेकर पुढे सामाजिक काम करताना सहचर झाला. घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आंतरजातीय विवाह केला. घरच्यांच्या परवानगीविना त्यांनी मित्रांसह आळंदीला जाऊन १४ एप्रिलला डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ₹ ४००/- मधे ₹ ५/- चे मंगळसूत्र मंदिराजवळच खरेदी करून ब्राह्मणाकडे लग्न केले. डॅा. बाबासाहेबांनी जाती नष्ट झाल्या पाहिजेत त्यासाठी आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत असे सांगितले होते. त्यामुळे या दिवशी विवाह केला तर आपण क्रांती केली असे होईल म्हणून हा दिवस त्यांनी निवडला. सासरीही लग्नाला विरोधच होता. लग्नानंतर २ महिने मोहन वाडेकर यांच्या मावसभावाकडे राहून नंतर सासरे न्यायला आले. २॥ महिन्यांनी ताईंचा गृहप्रवेश सासरी झाला. लग्नानंतर ताईंनी तिसरे लॅा चे वर्ष पूर्ण केले तेव्हाच सन १९९० मधे सरकारी वकीलासाठी अर्ज केल्याने मुंबईला पोस्टिंग मिळाले. त्यातच गरोदर राहिल्याने बराच त्रास होत होता. रेल्वे ने ये जा करत तीन वर्ष मुंबईला प्रॅक्टिस केली. मुलीला सांभाळायला आईला आणल्याने ती तीन वर्ष सुकर झाली.
पुण्यात बदली झाल्यानंतर डॅा. बाबा आढावांचे विषमता निर्मूलन याविषयीचे भाषण ऐकून ताई प्रभावित झाल्या. त्यांनी बाबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. आर.टी.ओ. मधे सरकारी वकील (असिस्टंट पब्लिक प्रॅासिक्युटर) म्हणून ताईंनी ३४ वर्ष सेवा केली. आर.टी.ओ. ची प्रतिमा मलीन असतानाही आपल्या कामामुळे, स्वतः नियम घालून घेतल्याने, कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यालय व कोर्टात काम केल्याने आपण ताठ मानेने जगू शकतो हे ताईंनी दाखवून दिले. सरकारी वकील म्हणून काम करताना ताईंनी केवळ वकीली न करता सामाजिक कामाला प्रचंड महत्व व वेळ दिला.

डॅा. बाबा आढाव यांचे सोबत काम सुरु झाल्यानंतर सिक्स सीटर शहरात चालवू नये यासाठी सलग ७ वर्ष न्यायालयीन लढा दिला व ३ आसनी रिक्षाला मान्यता मिळवून दिली. २००२ मधे मोलकरीण पंचायतीची स्थापना करून असंघटित कामगारांना एकत्र करायचे काम सुरू केले. २००५ मधे मोलकरीणींसाठी मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा काढला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक व मानसिक अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ताई स्थानिक तक्रार समितीच्या अध्यक्ष झाल्या. बी.पी.ओ., कॅाल सेंटर अशा ठिकाणी महिलांवर प्रचंड ताण व दडपण असते. महिलांनी जिल्हा अधिकारी नावे बॅास अथवा कोणाही पुरूषाविरोधात तक्रार अर्ज करून न्याय मागितला पाहिजे यासाठी महिला व पुरूषांचेही अवेअरनेस कार्यक्रम ताई आयोजित करतात.
वकीलीचे क्षेत्र आव्हानात्मक आहे. कोट घातला की लगेच पैसे मिळत नाहीत. अभ्यास, कष्ट, सामाजिक प्रश्नांची जाण व भान आवश्यक असते. त्यापध्दतीने ताई कार्यरत आहेत. ‘आपली समाजव्यवस्था ढोंगी आहे. बाईला देव्हाऱ्यात पूजेचे स्थान दिले जाते. पण घरात मात्र बायको, आई, बहिणीला समानतेने वागवले जात नाही. परंतु आमच्या घरात मात्र समानता मानणारा मोहन, मी वकील आहे तर तू जज्ज झालेली आवडेल असे म्हणणारा आहे.’ असे ताई अभिमानाने सांगतात. दोनही मुलांच्या मदतीने ताईंच्या यशस्वी सहजीवनाची ३५ वर्ष समाजाच्या संसारासह फुलली आहेत. मोहन शिवाय घरचे व घराबाहेरचे काहीही करणे शक्य नाही असे ताई नम्रपणे सांगतात.
सरकारी वकीलीतून निवृत्तीनंतरही ताई समाजाची वकीली अव्याहतपणे करत आहेत. समाजात सुमारे ९५% वर्ग हा असंघटित आहे यात मोलकरीण, मजूर, हमाल यांच्यासाठी काम करावं अशी ताईंची इच्छा आहे. आता त्या पूर्ण वेळ डॅा.बाबा आढाव यांचेसोबत कार्यरत आहेत. ताईंची मुलगी दिशा ही सध्या कोलंबिया विद्यापीठांत एल.एल.एम. करत आहे. तिला सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करायची संधी मिळाली आहे. तिने सुध्दा सामाजिक भावनेतून रोहित वेमुला, पायल तडवी यांच्या आईवडीलांना न्याय मिळवून देण्यासाठी व इतरही काही केसेस मोफत लढल्या आहेत. याचा चळवळीतील सर्वांनाच प्रचंड अभिमान आहे. ताईंच्या मुलानेही लॅा चे शिक्षण पूर्ण करून तो म्युझिक कंपोझरचे काम करतो. त्याचे म्युझिकचे शिक्षणही सुरु आहे. त्याच क्षेत्रात त्याला आपले नाव पुढे न्यायचे आहे.
यापुढील काळात पारधी व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे शिक्षण व त्यांच्यासाठी वसतिगृह काढायची ताईंची इच्छा आहे. किमान एक पिढी शिकली तर पुढे तो प्रवाह चालू राहील असे ताईंना वाटते. रस्त्यावर लिंबू, मिरची, फुगे, पिशव्या विकणारी लहान मुले पाहिली की फार वाईट वाटते म्हणून मला हे काम आता करायचे आहे असे ताई सांगतात.
ताईंच्या आजवरच्या प्रचंड कामामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रत्येक बाई ही दुर्गेचे रूप आहे. ती शूर आहे. फक्त तिला हवी संधी, समानता व एक अवकाश असे सतत सांगणाऱ्या प्रसिध्दी पराड्.मुख अशा आधुनिक नवदुर्गा ॲड. शारदाताईंना मानाचा मुजरा..!!
ॲड. शारदा वाडेकर – 91723 94479
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.