पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आषाढी वारीत नो पार्किंग झोन व व्हीआयपी पास बंद, ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले जात आहे…

श्रीमंतांच्या जोखडातून मुक्त, सर्वसामान्य जनता व गोरगरिबांचा बालाजी तथा पांडुरंगाची नाळ जोडली, वैष्णवांमध्ये भाविकभक्तीचा महापौर ओसांडला…
शासकीय महापुजेवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन सुरु राहणार असल्याने भाविकभक्तात समाधानाचे वातावरण…..
पंढरपूर (बारामती झटका)
भारताची दक्षिण काशी असे श्रीक्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी तीर्थक्षेत्राला समजले जाते. सर्वसामान्य गोरगरीब दीनदुबळ्या भोळ्या भाबड्या भक्तांचा देव म्हणून पांडुरंगाकडे पाहिले जाते. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी मंदिर समिती सदस्य, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत आषाढीवारी बैठकीच्या नियोजनामध्ये आजपर्यंतच्या वारीत पहिल्यांदाच महत्वपूर्ण व भाविकांच्या हितार्थ निर्णय घेतलेला आहे. आषाढीवारीत नो पार्किंग झोन व व्हीआयपी पास बंद या ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्वागत केले जात आहे. श्रीमंतांच्या जोखडातून पांडुरंग मुक्त करून सर्वसामान्य जनता व गोरगरिबांचा बालाजी तथा पांडुरंगाशी नाळ जोडली. वैष्णवांमध्ये भक्तीचा महापूर ओसांडू लागलेला आहे. शासकीय महापूजेच्या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मुखदर्शन सुरू राहणार असल्याने भाविकभक्तात समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी असून, आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करावे. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी वारी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी. तसेच शासकीय महापूजा संपताच तात्काळ रांगेतील भाविकांची दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी. शासकीय महापुजेवेळी मंदिरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन महापूजेला उपस्थितांची संख्या मर्यादित राहील याची दक्षता घेवून, शासकीय महापूजा विधीवत व परंपरेने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हिआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे, त्या कामामुळे विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल २४ जून पर्यंत पूर्ववत कराव्यात. तसेच यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेले काम थांबवून सदर ठिकाणची स्वच्छता करावी.

या कालावधीत नामदेव पायरी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नो पार्किंग झोन काटेकोरपणे पालन करावे. दर्शन रांगेतील स्काय व तात्पुरते उड्डाणपूलांची पाहणी करून ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का, याची तपासणी करावी. तसेच मंदिर व मंदिर परिसरातील इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, भाविकांना श्रींचे जलद दर्शन व्हावे तसेच दर्शन रांग जलद गतीने चालावी. त्याचबरोबर घुसखोरी रोखण्यासाठी ज्यादा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी समितीच्या वतीने विमा उतरविण्यात येणार आहे. दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार असून, दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाष्टा जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच मंदिर समितीकडून दर्शन रांगेत बॅरिगेटिंग, मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, कुलर, स्वच्छता गृह, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन व्यवस्था, सार्वजनिक सूचना प्रणाली आदी व्यवस्था उपलब्ध राहणार आहेत. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी १२६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. तसेच तसेच चंद्रभागा वाळवंट येथे महिला भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.