पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी अकलूजच्या काळ्या बाहूलीचा सुद्धा समावेश असण्याची चर्चा सुरू…

विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांचे समन्स जारी…
दहिवडी (बारामती झटका)
ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केले आहे. त्यांना आज दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच अकलूज येथील निरा नदीच्या काठाला किल्ल्याच्या बाजूला काळ्या बाहुल्यांचा जादूटोणा केलेला होता. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणात अकलूजच्या काळ्या बाहुलीचा समावेश असल्याचीही चर्चा माण खटाव मतदारसंघासह सातारा जिल्ह्यात सुरू आहे.
या प्रकरणात सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्याकडून समजपत्र देण्यात आले आहे. घार्गे यांनाही आज दि. ३ रोजी वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. खरात यांना अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी अटक केली होती.
या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयात पत्रकार खरात, संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयाने या तिघांना वडूज पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. या प्रकरणात आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रभाकर घार्गे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस वडूज पोलिसांनी पाठवली आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी पुणे येथील घरीदेखील पोलीस पथक काही दिवसांपूर्वी गेले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अकलूजच्या काळ्या भावल्यांचा जादूटोणा करणाऱ्या अकलूज बाहुली सुद्धा चौकशीसाठी समन्स जारी होईल अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.