पंचायत समिती मधील बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता लाचलुचपतच्या सापळ्यात अडकला….
माण (बारामती झटका)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा या पथकाने आज माण पंचायत समितीत सापळा रचून जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंत्यावर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.
बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने उर्किडे, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळा खोलीचे बांधकाम केले आहे. त्याचे बिल मंजुरीसाठी पाठवण्यासाठी लोकसेवक जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग दहिवडी येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या भरत संभाजी जाधव वय ५४, रा. दहिवडी यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यापैकी १५ हजार रुपये लाच रक्कम खाजगी व्यक्ती बुवासाहेब जगदाळे, वय ६१, रा. बिदाल, ता. माण यांच्या मार्फत दहिवडी पंचायत समिती, बांधकाम विभाग कार्यालयात स्वीकारली. यावेळी त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे भरत जाधव व बुवासाहेब जगदाळे यांच्या विरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे व गणेश ताटे यांनी केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.