ताज्या बातम्यासामाजिक

पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण…

बुधवारी सकाळी १० वा. पानीव येथे होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

पानीव (बारामती झटका)

पानीव, ता. माळशिरस गावचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर (वय ५५) यांना रविवारी (दि. २० जुलै २०२५) मध्यरात्री १ वाजता कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण प्राप्त झाले.

गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते. देशसेवेच्या पवित्र कार्यात तन-मनाने समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले.

त्यांच्या निधनामुळे पानीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने गावाने एक शूर, निष्ठावान आणि कर्तव्यदक्ष सैनिक गमावला आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा आप्तपरिवार आहे. बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचेल. तिथून लष्करी वाहनाने मध्यरात्रीपर्यंत पानीव गावात दाखल होणार असून, बुधवारी सकाळी १० वाजता लष्करी इतमामात पानीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पानीव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली.

हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्यावरील ही अपार दु:खद घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे.

वीर जवान यशवंत बाबर यांचा सैनिकी प्रवास –
जम्मू व काश्मीर येथे सलग १५ वर्षे देशसेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्याने सेवा बजावली.
त्यानंतर जैसलमेर (राजस्थान) येथे शुष्क सीमाभागात
पुणे (महाराष्ट्र) येथे प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदाऱ्या
सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथे दक्षिण भारतात
जबलपूर (मध्यप्रदेश) येथे मध्य भारतात
या विविध भागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले.

केवळ दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली कोची (केरळ) येथे झाली होती. जिथे ते 1307 DSC PL OSS मध्ये सेवा बजावत होते.

विशेष म्हणजे, येणाऱ्या एका वर्षातच त्यांची लष्करातून सेवानिवृत्ती होणार होती. परंतु, त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom