पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माळशिरस येथील होणाऱ्या सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सूचना

माळशिरस (बारामती झटका)
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची मंगळवार दि. ३०/४/२०२४ रोजी माळशिरस येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेण्यात येणार आहे. या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सूचना केल्या आहेत.
त्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशाला सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या नागरिकांना सकाळी ६.३० वाजल्यापासून येण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांची सुरक्षा तपासणी वेळेमध्ये पूर्ण होऊ शकेल. तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आगमनापूर्वी कमीत कमी एक तास अगोदर सर्व नागरिकांनी स्थानापन्न होणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांनी येताना मोठ्या बॅग, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ जसे – लाइटर, काडीपेटी इत्यादी तसेच विडी, सिगारेट, गुटखा असे पदार्थ सोबत आणू नये. सभेसाठी दिलेल्या वेळेत सभास्थळी यावे व वरील निषिद्ध पदार्थ सोबत बाळगू नये. तपासणी निर्धारित वेळेत व घाई गडबड न करता पूर्ण व्हावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.